आज राष्ट्रीय युवक दिन : लोकमत परिचर्चेत विविध क्षेत्रातील युवकांचा सूर गोंदिया : भारत तरूणांचा देश आहे म्हणून गवगवा केला जातो. परंतु देशातील तरूण बेरोजगारीच्या विळख्यात आहेत. आजघडीला तरूणांच्या समोर सर्वात मोठे आव्हान बेरोजगारीच आहे. शासन विविध योजना आणते, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी पध्दतीशिरपणे होत नसल्याने त्याचा फायदा दिसून येत नाही, असा सूर युवकांनी व्यक्त केला. लोकमततर्फे राष्ट्रीय युवक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या परिचर्चेत छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलम हलमारे, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, रेल्वे कमिटी सदस्य विक्की गोहरे, दिनेश उपाध्याय, पियुष हलमारे, रितेश मेंढे व जयप्रकाश भोयर सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, शासन पदभरती करीत नाही त्यामुळे बेरोजगारांचा लोंढा वाढत आहे. या देशातील तरूण बेरोजगार राहू नये यासाठी मोदी सरकाने मुद्रा लोन योजना सुरू केली. परंतु या योजनेचा बोजवारा निघाला. स्टार्ट अॅप इंडियाच्या नावाखाली मुद्रा लोन शुन्य व्याज, काहीही गहाण न ठेवता २५ टक्के अनुदानावर बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. परंतु बँकाकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या बेरोजगारांना आधी गहाण ठेवा नंतर कर्ज घ्या असा सल्ला बँकांनी दिला. सरकाच्या योजना चांगल्या असतात पण त्याच योजनांचा लाभ गरजूंना देण्यासाठी विविध कारणे सांगून त्यांना त्रास दिला जातो. त्रासाला कंटाळून तो व्यक्ती पैसे देण्यास तयार झाला की त्याला त्या त्या योजनेचा लाभ देण्यात येते. तरूणांपुढे बेरोजगारीची ज्वलंत समस्या आहे.धानाला भाव नाही म्हणून शिकलेला तरूण शेती करणे पसंत करत नाही. काही तरूण रोजगारासाठी शहरात पलायन करतात. तर बेरोजगारीमुळे काही वाममार्गाला लागतात. हुशार विद्यार्थ्याला शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे परिस्थितीला घेऊन रडत बसावे लागते. शिक्षणाच्या क्षेत्रात बाजारीकरण झाले असून याची सर्व कल्पना शासनाला असूनही शासन या शैक्षणिक संस्थाकडे लक्ष का घालत नाही. हुशार विद्यार्थी पैश्याअभावी शिक्षणापासून वंचीत राहात आहे. शासनाच्या शाळांमधील गुणवत्ता ढासळली असल्याने आजघडील गरिब व्यक्तीही आपल्या मुलाला शासकीय शाळांमध्ये शिकविण्यास तयार राहात नाही. आजडीला १०० पैकी ७० तरूणांकडे स्मार्ट फोन आहे. परंतु स्मार्ट फोन असलेल्या तरूणांपैकी ३० टक्के तरूण त्या फोनचा दुरूपयोग करतात. परंतु ७० टक्के लोक चांगल्या कामासाठी करतात. कॅशलेसची संकल्पना चांगली आहे परंतु त्यासाठी नियोजन आणि मानसिकता लक्षात घेऊन उपाययोजना करायला हवे. शासनाने कॅशलेससाठी सक्ती करू नये. राजकारणात तरूणांचा दुरूपयोग होतो. त्यांना सहज वाढण्याची संधी दिली जात नाही. पुढारी त्यांना दाबून ठेवतात असाही सूर उमटला. पायाभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या बाता हाकण्यात काही अर्थ नाही. मुलभूत गरजा पुर्ण केल्यानंतरच इतर गोष्टींकडे वळावे. बोलणे आणि करणे हा हेतू शासनाचा असावा. नुसत्या बाता हाकून चालणार नाही तर बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योगांकडे लक्ष घालवे. पुतळ्यांच्या नावावर जमीनी हडपण्याचे षडयंत्र अनेकांचे असते. महापुषांच्या कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांचे पुतळे उभारतो. मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली दिली जाते. त्यांच्या विचारांप्रमाणे वागा पुतळे उभारले नाही तरी चालेल. तरूणांना आवाहन करतांना व्यसन सोडा प्रगतीची कास धरा असे सांगत आपले आयकॉन सिनेसृष्टीतल कलावंताना नाही तर स्वामी विवेकानंद व त्यांच्या सारख्या महापुरूषांना ठेवा असा संदेश या तरूणांनी या चर्चासत्रातून दिला. (तालुका प्रतिनिधी)
समाजात युवकांपुढे बेरोजगारीचेच मोठे आव्हान
By admin | Updated: January 12, 2017 00:15 IST