देवरी : कोरोना संसर्गाची साखळी तोडणे हे एक मोठे आवाहन यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे. यामुळे संशयित रुग्णांचे वेळीच निदान करणे हे महत्त्वाचे आहे. मात्र काही खासगी डॉक्टर ‘आयएलआय व सारी’चे रुग्णांची परस्पर तपासणी करून घेत आहेत. या संदर्भात प्रशासनाला कसलीही माहिती देत नाही. हे लक्षात येताच तहसीलदार विजय बोरुडे यांनी तालुक्यातील १८ खासगी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. यामुळे खासगी डॉक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देवरी तालुक्यात वाढत असून बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडणे महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी यंत्रणेकडून कसोसीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तालुक्यातील खासगी डॉक्टरांकडून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंग दुखी यासारख्या आजाराच्या रुग्णावर परस्पर उपचार करून त्यांना कोरोना निदान चाचणी करण्याचा कसलाही सल्ला दिला जात नाही. किंबहुना आपत्ती कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन खासगी डॉक्टरांकडून केले जात नाही. हे देखील वाढत्या संसर्गाला वाव देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे तहसीलदार विजय बोरूडे यांनी कारवाईचा पवित्रा घेत तालुक्यातील १८ डॉक्टरांना ताकीद दिली आहे. साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या संदर्भ कायद्यानुसार नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल सदर ताकीद देण्यात आली आहे. तसेच आयएलआय व सारीच्या रुग्णांची रिपोर्ट न चुकता दररोज वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवरी येथे सादर करणे बंधनकारकच केले आहे. ही माहिती नियमित सादर न केल्यास दवाखान्याची मान्यता व परवाना रद्द करण्यात येणार तसेच रुग्णालयाला सील करून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार बोरुडे यांच्याकडून खासगी डॉक्टरांना ताकीद पत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.