परसवाडा : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील मृतक भरत हलकाई बसेने याने ३ नोव्हेंबर २०१४ रोजी लोधीटोला धापेवाडा शिवारात विद्युत खांबाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत दवनीवाडा पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. पण तक्रारकर्त्यांनी हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी भरतची पत्नी गिरजा व तिचा भाऊ यांनीच संगनमताने हत्या केली असून त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता दुसऱ्यावरच ठपका ठेवला आहे, असा आरोप भरतचा भाऊ गणेश हलकाई बसेने व भरतच्या पहिल्या पत्नीचा भाऊ मेघश्याम मस्करे यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मृतकाच्या पहिल्या पत्नीचा भाऊ मेघशाम धनलाल मस्करे रा. मुरदाडा हे दवनीवाडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना दोन ते तीन तास बसवून ठेवले. गंगाझरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक डोंगरे पाटील यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून दिले. पण तक्रारकर्त्यांना माहिती देण्यात आली नाही. पंचनामा बरोबर न करता पंचांची केवळ स्वाक्षरी घेण्यात आली.पंच धापेवाडा येथील दुर्गा बबारे व महेंद्र गयगये यांनी तक्रारकर्त्यांना सांगितले की, मृतक भरतचा एक हात तुटलेला व लिंगस्थान पूर्णपणे मुरकुटलेले होते. रुग्णालयातील परिचराचे हात तुटलेला असल्याचे सांगितले. पण डॉक्टरांनी पंचनाम्याच्या आधारावरच उत्तरीय तपासणी अहवाल तयार केले आहे. याबद्दल पोलीस अधीक्षकांशी तक्रारकर्त्यांनी ४ नोव्हेंबर २०१४ रोजीच भेटले. जोपर्यंत योग्य कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतकाचा अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण पोलीस अधीक्षकांनी कारवाई होईलच, अंतिम सत्कार करा, असे आश्वासन दिले होते. पण अद्याप योग्य कार्यवाही झाली नाही.मृतकाजवळ मिळालेल्या चिठ्ठीबद्दल पोलिसांनी तक्रारकर्त्यांना सांगितले नाही. यावरून गावातील नागरिक संशय घेत आहे. दवनीवाडा पोलिसांनी क्रिष्णा मारोती पापडकर या महिलेला व प्रभू सोरले यांचा प्रकरणात हात असल्याचा संशय घेवून कारागृहात रवानगी केली. पण या दोन्ही इसमांचा मृतक भरतशी काही घेणे देणे नाही. मृतक भरत शांत स्वभावाचा होता. मग या प्रकरणात आरोपीला सोडून संन्याशाला फाशी का, अशा सवाल मुरदाडा, धापेवाडा, महालगाव, लोधीटोला येथील नागरिकांनी करुन पोलिसांवर व डॉक्टरांवर ठेवत चुकीच्या पद्धतीने तपास व चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला मोकळीक दिल्याच्या आरोप केला जात आहे. याच्या निषेधार्थ गुरूवाारी ११ डिसेंबर २०१४ रोजी महालगाव बसस्थानकावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. २५० नागरिकांनी स्वाक्षरी करून या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)
‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार
By admin | Updated: December 10, 2014 23:00 IST