गोंदिया : बिरसी येथील विमानतळासमोर कामावरून कमी केलेल्या सुरक्षारक्षकांनी १९ जानेवारीपासून कुटुंबीयांसह आंदोलन सुरू केले होते. पण या आंदोलनाची दखल न घेतल्याने सुरक्षा रक्षकांनी १ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. दरम्यान, बुधवारी (दि. ३) रात्रीच्या सुमारास दोन आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली, तर मुलचंद तिघारे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तब्बल तेरा वर्षे विमानतळ प्रकल्पात काम करूनही विमानतळ प्रशासनाने स्थानिक नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आपल्याला न्याय मिळावा तसेच पुन्हा विमानतळ प्रकल्पात कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी सुरक्षारक्षकांनी बिरसी विमानतळाच्या गेटसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला तब्बल पंधरा दिवसाचा काळ लोटला तरी अजूनही जिल्हा व विमानतळ प्रशासनाने याची दखल घेतली नाही. जिल्ह्यातील आमदार, खासदार महोदयांनीसुद्धा या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे. दरम्यान, १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अन्नत्याग आंदोलनातील आंदोलनकर्ते मुलचंद तिघारे यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना बुधवारी रात्री ताबडतोब प्रशासनातर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तरीही जिल्हा व विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांत जिल्हा व विमानतळ प्रशासनाच्या विरोधात मोठा रोष दिसून येत आहे. दरम्यान, गुरुवारपासून सुभाष निखाडे, सुरेश पटले, झुंनासिंग बरेले, अशोक उपवंशी, लोकेश बनाफर, उत्तम गुरुबेले या सहा सुरक्षारक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
......
उपचार घेण्यास नकार
आंदोलनकर्ते सुरक्षारक्षक मुलचंद तिघारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तिघारे यांनी आधी मागण्या मंजूर करा तेव्हाच औषध गोळ्या घेणार, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे काही वेळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.