भोसाजवळील पहाटेचा थरार : नागरिकांनी केला एक तास ‘रास्ता रोको’कालीमाटी : येथील भोसा-कामठामार्गे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या दोन युवा शेतकऱ्यांसह त्यांच्या बैलांना जोरदार धडक देऊन पळ काढला. यात दोन्ही युवकांसह सहा बैल जारीच ठार झाले. ही घटना सोमवारी (दि.२७) पहाटे ३.३० च्या दरम्यान घडली. मात्र पोलिसांना कळवूनही त्यांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच विलंब केल्याने आणि धडक मारणाऱ्या अज्ञात ट्रकला पकडू न शकल्यामुळे सकाळी या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.सविस्तर असे की, कामठा-आमगाव रस्त्यावरील भोसा मार्गे पहाटे ३.३० च्या दरम्यान तीन शेतकरी काटी येथील बाजारातून बैलांना घेऊन आममगावकडे पायदळी जात होते. त्यादरम्यान एका अज्ञात ट्रकने जबर धडक दिल्याने सुपलीपार येथीेल दोन शेतकरी व सहा जनावरे जागीच ठार झाले. मृतकांमध्ये सत्यवान तुळशीराम बहेकार (२६) व नामदेव जयराम मेंढे (२८) दोन्ही रा.सुपलीपार यांचा समावेश आहे. या अपघातात एक मजूर थोडक्यात बचावला, त्याचे नाव दिगंबर शेंडे (२०) रा. सुपलीपार असे आहे. पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने गावकऱ्यांनी १ तास कामठा मार्ग रोखून धरला. यादरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवरे यांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांची समजूत घातली. सदर ट्रकवर काळ्या कपड्याचे आवरण होते. तो टाटा कंपनीचा असल्याची माहिती प्रात्यदर्शी दिगंबर शेंडे यांनी सांगितले.(वार्ताहर)पोलिसांची अशीही संवेदनहीनताअपघाताची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. पण स्टेशन डायरीवरील पोलीस हवालदाराने पोलीस स्टेशनला येवून तक्रार द्या, अशी सूचना गावकऱ्यांना दिली. आमगाव पोलीस स्टेशन गाठून पोलीस पाटील यांनी तक्रार देवूनही येथील बीट जमादार सकाळी ८ वाजता आले. सकाळी ३.३० वाजतापासून सकाळी बराच वेळपर्यंत मृतदेह रस्त्यावर पडून होते. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांमध्ये रोष दिसून येत होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवरे यांनी संबंधित हवालदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.सुरेश हर्षे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनवाहनाचा शोध घेण्यात यावा व मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे पत्र देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेश वाकचौरे यांनी जिल्हा निधीअंतर्गत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा निधीअंतर्गत मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले.डिवायएसपी मंदार जवरे यांनी कामठामार्गे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले असून लवकरच वाहन व वाहन चालकास अटक केली जाईल असे सांगितले. सदर शेतकरी कुटुबांची परिस्थिती हलाकीची आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी अपघात बिमा व आर्थिक मदत देण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा हर्षे यांनी दिला. यामुळे नागरिक काहीसे शांत झाले.
ट्रकने दोन युवा शेतकऱ्यांसह सहा जनावरांना चिरडले
By admin | Updated: March 28, 2017 00:45 IST