सौंदड : गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावरील सौंदड रेल्वे स्टेशन हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु येथील अपुर्या सोयी-सुविधामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या या स्टेशन नेहमीच मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. या स्टेशनवर प्रवाशांना तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गाडी स्टेशनवर येण्याच्या अर्धा तास अगोदर तिकीट विक्रीला सुरूवात होते. येथे तिकीट विक्रीसाठी एकच काऊंटर असल्याने प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. या अर्ध्या तासात काही प्रवाशी तिकीट मिळविण्यात यशस्वी ठरतात तर काही प्रवाशी स्टेशनवर गाडी आल्यानंतर तिकीट विक्री बंद झाल्याने तिकीटापासून वंचीत राहतात. अशातच दुसरी गाडी नसल्याने नाईलाजाने विनातिकीट प्रवास केल्याने या प्रवाशांना पकडले जाण्याची भिती प्रवासादरम्यान सतत भेडसावत असते आणि पकडली गेले तर अशा प्रवाशांना नाहक २६० रुपये दंड रुपाने द्यावे लागते. प्रवाशांवर ही नामुष्की येऊ नये यासाठी रेल्वे विभागाने येथे पूर्ण वेळ तिकीट विक्री सुरू ठेवावी अथवा एकापेक्षा जास्त तिकीट विक्रीचे काऊंटर शुरू करण्याची मागणी प्रवाशांनी ‘लोकमत’जवळ बोलून दाखविली. या रेल्वे स्टेशनवर सावलीच्या अपुर्या शेडमुळे पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहून रेल्वेची प्रतिक्षा करावी लागत आहे. किमान चार महिन्यांपासून सावलीच्या शेडकरीता सांगाडा उभा केला आहे. परंतु या सांगाड्यावर पत्रे लावण्यात आली नसल्याने याचाही लाभ उन्हाळ्यात प्रवाशांना घेता येत नाही. रेल्वे स्टेशन लांब असण्याने असे अनेक शेड उभारण्याची गरज आहे. जेणेकरून प्रवाशांना सावलीचा आडोसा घेता येईल. येथे ३ ते ५ वाजेपर्यंत आरक्षण करण्याचा कालावधी असून हा अपुरा कालावधी असल्याने येथे पूर्ण वेळ आरक्षण करण्याची व्यवस्था ही करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांना आरक्षणाला मुकावे लागणार नाही. (वार्ताहर)
सौंदड रेल्वेस्थानकावर प्रवासी रखरखत्या उन्हात
By admin | Updated: May 10, 2014 02:27 IST