वाहनधारकांत रोष : मोटार वाहन कायद्याची अवहेलना रावणवाडी : गोंदिया-बालाघाट राज्य मार्गावर वाघ नदीच्या काठावर शहर वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी वाहनांचे कागदपत्र तपासणी करुन विविध कारणे पुढे करुन तीन-चार तासातच वाहनधारकाकडून हजारो रुपयांची अवैध पठाणी वसूली करीत आहेत. यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळासाठी थांबत असून वाहनधारकांना त्यांचा भितीने अन्य मार्गाचा शोध लावावा लागत आहे. सर्रास हा प्रकार सुरू असून यावर कुणाचेही वचक दिसून येत नाही.वाघ नदीच्या काठा जवळ बंद असलेल्या धाब्याजवळ शहर वाहतूक शाखेचे सुमो वाहन क्रमांक एम.एच.३५/डि.४६७ थाटाने उभी करुन मार्गावरुन ये-जा करणाऱ्या दुचाकीव चारचाकी वाहनांना अडवून वाहन धारकांवर आपल्या पदाचा मनमानी वापर केला जात आहे. हजारो रुपये उकळण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवैध वसूलीचा गोरखधंदा सुरु केला आहे.सध्या ग्रामीण भागात लग्न सराईची सर्वत्र धुमधाम आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित होण्याकरिता सायंकाळी ५ वाजतापासून वर्दळ असते. त्याच संधीचा फायदा घेण्यासाठी शहर वाहतूक पोलिस नेमके त्याचवेळी नदी काठावर उपस्थित होत असून वाहनधारक या पोलिसांच्या कचाट्यात सापडतच आहेत. तीन ते चार तासांच्या वसुलीतून हजारो रुपये जमा करण्यात येत असल्याची माहिती वाहनधारकांकडून समोर येत आहे. वाहनधारकांकडून अवैध वसुलीच्या कामासाठी खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत असल्याचीही माहिती विश्वसनीय सुत्रांकडून म्ळिाली आहे. हे बेकायदेशीर गैरकृत्य कोणत्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होत आहे हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसाठीच संशोधनाचा विषय ठरला आहे.शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी नियुक्त्या करीत असते. मग हे कर्मचारी आपल्या कर्तव्याचे ठिकाण सोडून शासकीय वाहनांचा दुरुपयोग करुन कर्तव्याचे ठिकाण सोडून कोरणी घाटावर ठिय्या मांडून पद व अधिकारांचा दुरूपयोग करुन वाहनधारकांकडून सर्रास वसुली करीत आहेत. भिती पोटी वाहनधारकही दंड भरून मोकळे होतात. या वर्षात तालुक्यातील ग्रामीण भागाच्या अंतर्गत रस्त्यांवर सुद्धा देखरेख करुन मिळेल त्या ठिकाणी शिकार फस्त करीत असल्याची ओरड ग्रामीण भागातील वाहनधारकांकडून होत आहे. वाहन धारकांमध्ये विभागाप्रती रोष निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
वाघ नदीच्या काठावर वाहतूक पोलिसांची पठाणी वसुली
By admin | Updated: May 20, 2016 01:35 IST