महिला पोलिसाची सतर्कता : नागरिकांनी केला पाठलाग गोंदिया : सिनेमाप्रमाणे एखाद्या चोरट्याच्या मागे लोक लागतात आणि ऐनवेळी हिरो येऊन त्या चोरट्याला पकडण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो, तसाच अनुभव मंगळवारी रात्री गोंदियातील मार्केट परिसरात आला. यात शहर पोलीस ठाण्याच्या एका महिला शिपायाने हिंमत दाखवत त्या चोरट्याला पळून जाण्यापासून रोखले. शहराच्या गोरेलाल चौकातील कमल बुक डेपोजवळ घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेत एका व्यापाऱ्याची ११ हजार रुपयांची बॅग घेऊन पळणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, शहरातील व्यापारी विपीन दिनेश जयपुरीया (२७) हे दुकान बंद करून गल्ल्यातील ११ हजार रुपये एका काळ्या बॅगमध्ये टाकून घरी जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील मोहगावखारा येथील रहिवासी असलेल्या राहूल हसनलाल गराडे (२१) याने ती बॅग हिसकावून पळ काढला. यावेळी जयपुरीया यांनी चोर-चोर अशी आरडाओरड केली. त्यामुळे नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. परंतु तो जोरात धावत सुटला. गोंदिया शहर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७९, ५११ अन्वये गुन्हा दाखल केला. गुनेश्वरी भांडारकर यांनी दाखविलेल्या या धाडसाचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे. पोलीस २४ तास कर्तव्यावर असतात याची प्रचिती गुनेश्वरी भांडारकर यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी) -अन् चोरटा हाती लागला गोंदियाच्या पोलीस दलात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेल्या महिला नायक शिपाई गुनेश्वरी मुकेश भांडारकर (सोनेवाने) (बक्कल नं. ३८६) आपल्या कुटुंबियांसह शितलामाता मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. समोरून एक तरूण धावत येत आहे व नागरिक त्याचा पाठलाग करीत आहे असे चित्र त्यांना दिसताच त्यांनी पळत सुटलेल्या तरूणाला अडवून खाली पाडले. त्यामुळे मागून आलेल्या नागरिकांनी लगेच त्याला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
व्यापाऱ्याला लुटण्याचा डाव हाणून पाडला
By admin | Updated: July 21, 2016 01:05 IST