चार लाखांची भरपाई : विमा कंपनीला झटकागोंदिया : नक्षलवाद्यांनी जाळलेल्या ट्रॅक्टरच्या नुकसानभरपाईचा दावा नाकारणाऱ्या युनायटेड इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचाने चांगलीच चपराक दिली. चार लाख रूपये रक्कम मिळेपर्यंत दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने ग्राहकाला देण्याचे आदेश ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष अतुल आळसी यांनी सदर विमा कंपनीला दिले.नामदेव पांडुरंग नाकाडे रा.नवनीतपूर ता.अर्जुनी-मोरगाव असे ट्रॅक्टरधारक व तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा महगावकडून कर्ज घेवून एक्स.एम. कंपनीचा स्वराज ८३४ ट्रॅक्टर (एमएच ३५/जी-४४६२) विकत घेतला. युनायटेड इंडिया विमा कंपनीच्या पॉलिसी अन्वये ३१ मार्च २०१२ ते ३० मार्च २०१३ कालावधीसाठी विमाकृत केला होता. १२ एप्रिल २०१२ रोजी डोंगरगाव येथील कक्ष-२४९ मधील विटांची वाहतूक करतेवेळी डोंगरगाव ते पोकळडोंगरी जंगलाच्या रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता नक्षलवाद्यांनी सदर टॅक्टर जाळला. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला.नाकाडे यांनी पाच लाख ७५ हजार रूपये भरपाई मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. मात्र सतत पाठपुरावा करूनही कंपनीने विमा दावा निकाली न काढता उलट संयुक्तीक कारणांअभावी दावा फेटाळला. त्यामुळे सदर प्रकरण २० मार्च २०१४ रोजी न्यायमंचात दाखल करण्यात आले. कंपनीला नोटिसेस पाठविल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांनी सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीचा उपयोग कृषीसाठी करण्यात येत नव्हता. शिवाय घटनेच्या वेळी चालकाकडे वैध परवाना नव्हता. त्यामुळे सदर प्रकरण खारिज करण्यास पात्र असून दिवाणी न्यायालयात चालविण्यासाठी पाठवावे, असे नमूद केले. वैनगंगा क्रिष्णा ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांनी, सदर दावा प्रस्ताव पाठवून मंजुरीसाठी शिफारसपत्र विमा कंपनीला पाठवून वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे आपल्या जबाबात नमूद केले. नुकसानभरपाईपोटी विमा पॉलिसीत नमूद ट्रॅक्टरची किंमत चार लाख रूपये द्यावी, २० मार्च २०१४ पासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याज द्यावे, त्रासापोटी २५ हजार रूपये द्यावे, तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये द्यावे व सदर आदेशाचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा आदेश विमा कंपनीला दिला.
नक्षल्यांंनी जाळलेल्या ट्रॅक्टरचा विमा न्यायमंचात ग्राह्य
By admin | Updated: June 10, 2015 00:44 IST