कृषी यांत्रिकीकरण : उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून अनुदानतिरोडा : राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१५-१६ अंतर्गत तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदानावर ट्रॅक्टरचे वाटप केले जात आहे. आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते ४ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची चाबी हस्तांतरीत करण्यात आली.तिरोडा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचविण्यास पुढाकार घेत आहे. त्याच अनुषंगाने कृषि अभियांत्रिकी योजनेंतर्गत नामदेव रामाजी भांडारकर नवेझरी, दुर्मिल बाबुलाल चौधरी काचेवानी, देवलता देवदास पारधी पालडोंगरी, मंतुरा मनिराम रिनाईत चिरेखनी यांनी अनुदानावर ट्रॅक्टरकरिता मागणी केली.महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांच्याकडून ट्रॅक्टर प्राप्त करून सदर ट्रॅक्टर आ.विजय रहांगडाले यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी तिरोडा पी.व्ही. पोटदुखे, मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले, कृषी सहायक, शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. शेतातील उत्पादनात वाढ होण्यासाठी कृषी विभाग यांत्रिकीकणाला चालना देत आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून अल्प, अत्यल्प व इतर शेतकऱ्यांकरिता १ लाख व महिला शेतकरी अनुसूचित जातीकरिता १.२५ लाख रुपये अनुदान मर्यादा ठरविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याकरिता राज्यातील कृषी विभाग विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करुन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे, नवनवीन तंत्रज्ञानातून उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप
By admin | Updated: February 29, 2016 01:20 IST