गोंदिया : नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात कोका अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढूनही गेल्या आर्थिक वर्षात पर्यटकांची संख्या मात्र कमी झाली. वन्यजीव विभागासाठी हा संशोधनाचा विषय ठरत आहे. आर्थिक वर्ष सन २०१३-१४ पेक्षा सन २०१४-१५ मध्ये तब्बल सहा हजार ४९३ पर्यटकांची घट झाल्याचे दिसून येत आहे.आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला एकूण ३२ हजार ८६ पर्यटकांनी भेटी दिल्या. यात नागझिरा अभयारण्याला तीन हजार ५७८, नवीन नागझिरा अभयारण्याला २४ हजार ५७९, नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला एक हजार ४१२, नवेगाव अभयारण्याला ११० तर कोका अभयारण्याला दोन हजार ४०७ पर्यटकांनी भेटी दिल्याचे वन्यजीव विभागाने नमूद केले आहे. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत नागझिरा अभयारण्याला १७ हजार ९२, नवीन नागझिरा अभयारण्याला १९ हजार २७४ व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला दोन हजार २१३ अशा एकूण ३८ हजार ५७९ पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. त्या आर्थिक वर्षांत कोका अभयारण्याचा समावेश नसतानाही किंवा तेथील पर्यटकांची संख्या गृहीत धरली नसतानाही जवळपास साडे सहा हजार पर्यटकांची संख्या अधिक होती. मात्र या आर्थिक वर्षात ही संख्या रोडावल्याने वन्यजीव विभागावर संशोधनाची पाळी आली आहे. विशेष म्हणजे पर्यटक संख्या जरी रोडावली असली तरी उत्पादन मात्र यावर्षी दुप्पट झाले. यामागे प्रवेश शुल्क व वाहन शुल्क अधिक असणे, हेच कारण असावे. (प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांनी फिरविली पाठ
By admin | Updated: May 9, 2015 01:29 IST