गोंदिया : शहरातील नागरिकांच्या बहुप्रतीक्षीत मागण्यांचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर विविध कामांचे लोकार्पण सोमवारी (दि.१) होत आहे. यात महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म-३ ऐवजी प्लॅटफॉर्म-१ वरून धावावी, स्थानकावर वृद्ध व अपंगांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाता यावे यासाठी लिफ्टची सोय असावी, तसेच लिफ्ट व एस्कलेटरच्या कामासाठी जुने पूल तोडून नवीन पूल तयार होवून ती गैरसोय टाळण्यासाठी त्वरित पादचारी पूल सुरू करावे, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या मागण्या आता पूर्ण झाल्या आहेत. सोमवारी (दि.१) सकाळी ८.२० वाजता खासदार नाना पटोले यांच्या हस्ते महाराष्ट्र एक्सप्रेसला हिरवी झेडीं दाखवून होमप्लॅटफॉर्मवरून नागपूरच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. यानंतर प्लॅटफॉर्म-१ ते ३ दरम्यान तयार करण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात येईल. त्यानंतर प्लॅटफॉर्म-१ ते ३ साठी फुट ओव्हर ब्रिजचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी खासदार पटोले, आमदार गोपालदास अग्रवाल, डीआरएम अग्रवाल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत प्रमाणपत्र शिबिर घेण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
विविध कामांचे आज लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:46 IST