दगडांवर भार : दोन वर्षांपासून टायर मिळालेच नाहीगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात एक जीप मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून दगडांवर उभी आहे. ही जीप जिल्हा क्षयरोग विभागाची आहे. मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सदर जीपला तीन टायर उपलब्ध होवू शकले नाही. शासकीय कामकाज किती ढिसाळ असते, याचेच हे एक ज्वलंत उदाहरण आहे.कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेहमीच शासकीय वाहन मोठ्या संख्येने उभे राहतात. परंतु आजपर्यंत केटीएस रूग्णालय किंवा दुरूस्तीसाठी आलेल्या दुसऱ्या रूग्णालयातील वाहनांची कधी चोरी झाली नाही. परंतु क्षयरोग केंद्राच्या वाहनाची चोरी का झाली? याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. उल्लेखनिय म्हणजे सदर जीपची चोरी झाल्यावर दुसऱ्या दिवसी ती कारंजा येथे आढळली होती. त्या जीपचे तीन टायर काढण्यात आले होते. कशातरी पद्धतीने या जीपला परत आणण्यात आले. जीपच्या टायरांची चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. परंतु आतापर्यंत चोरांना पोलीस पकडू शकली नाही.जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने शासनाला टायरांची मागणी करण्यात आली. दोन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही शासनाकडून टायर मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे सदर जीप आतापर्यंत दगडांवर उभी आहे. जीपच्या अभावामुळे शक्यतो भाड्याच्या जीपने काम चालवावे लागत आहे. जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांकडे केटीएस रूग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पदभार आहे. केटीएस रूग्णालयाच्या जीपनेच ते अनेकदा काम चालवून घेत आहेत. परंतु अशाप्रकारे उधारीच्या व्यवस्थेवर जिल्हा क्षयरोग विभागाचे काम किती दिवस चालणार? टायर खरेदीसाठी आणखी किती दिवसांची वाट पहावी लागेल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. (प्रतिनिधी)आता टायर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. जेव्हा टायर येतील तेव्हाच जीपचा उपयोग होवू शकेल. स्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा आहे.-डॉ. विनोद वाघमारे,जिल्हा क्षयरोग अधिकारी, गोंदिया.
क्षयरोग केंद्राचे वाहन टायरविनाच
By admin | Updated: May 10, 2015 00:26 IST