लोकप्रतिनिधी मूग गिळून : शेतकऱ्यांवर आसमानी व सुलतानी अवकृपा संतोष बुकावन अर्जुनी मोरगावशेतकऱ्यांसाठी आस्मानी संकट नवीन नाही, ते तर त्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. परंतु यात सुलतानी संकटाची भर पडल्याचे चित्र दिसून येते. तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रावर वजनकाटा करण्यासाठी हजारों क्विंटल धान उघड्यावर पडले आहे तर काही केंद्रावर अजिबात गर्दी नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ठरवून दिलेल्या खरेदी केंद्राच्या सक्तीमुळे शेतकरी त्रासले आहेत. मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या हिताची मुक्ताफळे उधळणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.खरीप हंगाम गेला, धानाला भाव नाही, उन्हाळी पीक निघाले, आता धान खरेदी करणाऱ्या संस्था पिळवणूक करीत आहेत. २०, २१ व २२ जून रोजी संततधार पाऊस सुरू होता. शेतकऱ्यांनी पूर्वीच धान विक्रीसाठी केंद्रावर आणून ठेवले होते. मात्र या धानाचा वजनकाटा झालाच नाही. ज्या वाहनाने धान आणले तसेच त्यात पडून होते. त्यावर कशीबशी ताडपत्री अथवा पॉलिथीन झाकून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. तरीसुद्धा काही धानांना कोंब फुटले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या एका खुल्या शेडमध्ये पाणी शिरले. त्यात धान दिसून आले. हा सर्व घोळ मार्केटिंग फेडरेशन गोंदियाच्या चुकीच्या नियोजनामुळे झाला, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. कुठलेही शासकीय परिपत्रक अथवा जिल्हा प्रशासनाचे पत्र नसतानाही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तालुक्यातील गावांच्या सात खरेदी केंद्रांवर विभागणी केली. ज्या खरेदी केंद्रामध्ये गवाचे नाव नमूद आहे त्या गावातील शेतकऱ्यांनी त्याच खरेदी केंद्रावर धान विक्री करणे बंधनकारक आहे, असे पत्रक काढले व त्याच पद्धतीने धान खरेदी केले. यापूर्वी असा नियम नव्हता. तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही केंद्रावर धान विक्रीची मुभा होती. या सक्तीमुळे ठराविक केंद्रावर रांगा दिसून येत होत्या. तर काही खरेदी केंद्रावर अगदी शुकशुकाट होता. रविवारला (दि.२१) दिवसभर पाऊस सुरू होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका खरेदी केंद्रावर सायंकाळी ६ वाजता धान मोजणी सुरू होती व अनेक ट्रॅक्टरमध्ये ताडपत्री लावून धान मोजणीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत होते. तर लगतच्याच दुसऱ्या धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी धान नसल्याने ते कुलूपबंद होते. फेडरेशनने केलेल्या सक्तीचा हा दुष्परिणाम होता.सतत तीन दिवस आलेल्या पावसामुळे धानात ओलावा आला. फेडरेशनच्या नियोजनशून्य अशा कारभारामुळे संस्था अधिकचा ओलावा असल्याचे नाटक रचून शेतकऱ्यांकडून ओलाव्यापोटी अधिकचे धान घेणार. एकदा विक्रीसाठी आलेले धान शेतकरी परत नेणार नाही या संधीचा संस्था पुरेपूर फायदा घेणार आहेत. यात शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नाही. मार्केटिंग फेडरेशनच्या नियोजनशून्य कारभाराचा हा दोष आहे. मात्र यात शेतकरी बळीचा बकरा बनत आहे. यावर्षी अगदी धान खरेदी सुरू झाली तेव्हापासूनच कडक उन्ह असतानासुद्धा ओलावा व तूट म्हणून संस्थांनी ४० किलो धानामागे ४१ किलो प्रमाणे वजन घेतले. या अधिकच्या एक किलो फरकाची रक्कम लाखों रुपयांच्या घरात जाते. यावर मार्केटिंग फेडरेशनचे वरदहस्त आहे. सदर प्रतिनिधीने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा हा प्रकार बंद करण्याचे सांगितले होते. या ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे तीन कर्मचारी देखरेखीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्या डोळ्यादेखत धान खरेदी करणाऱ्या संस्था ४० ऐवजी ४१ किलोचे वजन घेत आहेत. यात सर्व श्रृंखला जुळलेली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पावसात धान भिजण्याच्या भीतीपोटी त्वरित आपला नंबर लावण्यासाठी ५०० रुपये मागणी असल्याचीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.
हजारो क्विंटल धान उघड्यावर
By admin | Updated: June 25, 2015 00:51 IST