बाराभाटी : गेल्या काही महिन्यांपासून गोंदिया-चांदाफोर्ट धावणाऱ्या प्रवासी रेल्वेमध्ये दररोज तृतीयपंथीयांचा धिंगाणा सुरू आहे. हे तृतीयपंथी प्रवाशांकडून बळजोरीने १० किंवा त्यापेक्षा अधिक रूपये वसूल करतात. यामुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत असून याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.गोंदिया या मुख्य जिल्ह्याच्या ठिकाणाहून सुटणाऱ्या रेल्वे गाडीमध्ये सौंदड, खोडशिवनी, गोंडउमरी, वांगी-चिंगी या गावामध्ये राहणारे काही तरूण तृतीयपंथीयांची वेशभुषा धारण करतात. ते तृतीयपंथी नसून तृतीयपंथीयांना बदनाम करून त्यांच्या वेशात सोंग करून रेल्वेच्या प्रवासी गाडीमध्ये प्रवाशांकडून बळजबरीने पैसे उकळणे सुरू केले आहे. या लोकांनी हे रोजचेच त्रास देणे सुरू केले आहे.प्रवाशांकडून ‘दहा रुपये दे नाही तर...’ असे धमकावून प्रवाशांची लुटमार करीत आहेत. त्याचप्रमाणे दररोज ये-जा करणारे, आयुष्याचा ध्येय उरावर घेवून शिक्षण घेण्यासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही बळजबरीने ढोंगी तृतीयपंथी दहा रुपये दररोजच वसूल करताना दिसत आहेत. एखाद्या वेळी पैसे न दिल्यास प्रवाशांना शिव्या खावून अपमान सहन करावा लागत आहे. तसेच कधी-कधी मारहानीचे प्रसंग तृतीयपंथीमुळे रेल्वे गाडीमध्ये पहायला मिळत आहेत. कुण्या प्रवाशाने रूपये दिले नाही तर ते त्यांचे सामान-साहित्यसुद्धा हिसकावतात.दररोजच्या प्रवाशांना तृतीयपंथीमुळे त्रास सहन करावा लागत असेल तर रेल्वेचा सुखाचा प्रवास कसा? असे प्रवासी म्हणतात. अशा प्रकारांची तक्रार किंवा बंदोबस्तासाठी रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी किंवा रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा बल आहे. पण या सुरक्षा बलाचे कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका बजावताना दिसतात. या प्रकाराला आळा कोण घालणार? तृतीयपंथींचा पैसे वसुलीचा काम बंद कधी होणार? तृतीयपंथीयांचे सोंग करणाऱ्या लोकांवर वचक कोण बसवणार? नागरिकांचा त्रासदायक प्रवास कधी थांबणार? असे प्रवास करणारे नागरिक, व्यावसायीक व विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे.रेल्वे प्रशासनाचे याची दखल घेवून तृतीयपंथीयांचा धिंगाणा त्वरित बंद करावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)
तृतीयपंथीयांचा धिंगाणा कायम...
By admin | Updated: April 8, 2015 01:35 IST