आमगाव : काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात चौघांना हिरावले. अन् या दुःखाच्या क्षणात कालीमाटी गावात चुली पेटल्याच नाही.
तालुक्यातील कालीमाटी गावातील चार मुलांचा मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवारी सायंकाळपर्यंत गावात स्मशानशांतता पसरली होती. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. चौघांवरही बुधवारी (दि.८) रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही.
तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी मारबत विसर्जनासाठी गाव शिवारजवळील वाघ नदीत आंघोळीसाठी उतरले असता संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१८), मयूर अशोक खोब्रागडे (२१), सुमित दिलीप शेंडे (१८) या चौघांचा नदीत वाहून सणाच्या दिवशी जीव गेला. चारही कुटुंबातील एकुलती एक मुले पाण्यात वाहून गेल्याची माहिती धडकताच गावात स्मशानशांतता पसरली. जो तो आठवणीत गहिवरताना दिसत होता. संतोष, रोहित, मयूर, सुमित हे आईवडिलांना वारस म्हणून एकुलते होते. कुटुंबातील बहिणींनी एकुलता भाऊ गमावल्यामुळे त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. काही दिवसांपूर्वी साजरा केलेला रक्षाबंधनाचा सण बहिणीसाठी शेवटचा ठरला.
सर्व कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत चौघांवरही कालीमाटी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मृतांच्या नातेवाईकांसोबतच अंत्यसंस्काराला उपस्थित जनसमुदायालाही त्यांचे अश्रू आवरता आले नाही. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेने कालीमाटी गावात मात्र चुली पेटल्या नाही.
------------------------------
कानी आला फक्त रडण्याचा आवाज
मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मृत चारही मुलांच्या कुटुंबीयांच्या रडण्याचा आवाज सोडून गावात शांतता पसरली होती. बुधवारी सकाळ चौघांचे मृतदेह हाती येताच गावात अश्रूंचा पूरच आला व फक्त रडण्याच्या आवाजाने कालीमाटी दणाणले होते.