मांसभक्षी संकटात : अन्नसाखळीचा समतोल बिघडण्याची शक्यतागोंदिया : पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे. अन्नसाखळीमुळे सृष्टीतील जीवांमध्ये विविधता आढळते. पूर्वीच्या काळात चोहीकडे घटदाट स्वरुपाचे अरण्य होते. त्यात तृणभक्षी प्राण्यांना खाऊन मांसभक्षी प्राणी जगत होते. परंतु आधुनिक काळातील काही वर्षात जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. मानवाच्या अती महत्त्वाकांक्षेमुळे प्राण्यांची अन्नसाखळी मात्र खंडित होत आहे. त्यामुळे वाघ, सिंह, कोल्हे यासारखे मासंभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.चीन हा देश वांघाचे मूळ आणि कुळ असल्याचे अनेक दाखले मिळतात. त्यानंतर वाघांचा इतरत्र भागात फैलाव झाल्याचे कळते. त्याकाळी वाघाच्या आठ उपप्रजाती अस्तित्वात होत्या. परंतु आजघडीला मात्र केवळ पाच उपजाती शिल्लक आहेत. यावरुन वाघांची संख्या किती झपाट्याने कमी होत आहे, याची सहज कल्पना येऊ शकते. पूर्वीच्या काळी घनदाट, विशाल व विस्तृत जंगले होती. जंगलात फक्त नानाविध प्राण्यांचे साम्राज्य होते. जंगलाचे नाव जरी काढले तर अंगावर काटे उभे राहायचे. भीतीमुळेच जंगले सुरक्षित होती. परंतु माणूस जसाजसा प्रगतीचा एकेक टप्पा गाठत गेला, तशी त्याची महत्वकांक्षा वाढत गेली. वितभर पोटासाठी त्याने वाघांच्या हत्या तर घडवून आणल्याच शिवाय हरणासारख्या तृणभक्षी प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात फडशा पाडला. कधी छंदापायी तर कधी पैशाच्या लालसेने वन्यजीवांना संपविण्यात आले. थुईथुई नाचणाऱ्या मोरांचे मांस खाण्यात माणसांना मजा वाटू लागली. मांस खाण्याची मनुष्याची लालसा व पैशाचा लोभ या प्रकाराने त्याने कायद्याचे उल्लंघन करून छपूनचोरून वन्यप्राण्यांच्या शिकारी करणे सुरू ठेवले.काही संवेदनशील माणसांनी या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे शासनाने शिकारीवर निर्बंध लादले. परंतु या नियमांची अंमलबजावणी करण्याची यंत्रणाच संवदेनशील नसल्यामुळे प्राण्यांची हत्या अजून थांबलेली नाही.वन्यजीवांच्या होणाऱ्या हत्येमुळे काही प्राणी नामशेष तर राहणार नाही, असा प्रश्न शासनाला पडला. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्र तयार करण्यात आले. जंगलाचे काही क्षेत्रफळ केवळ वन्यजीवांसाठी राखीव ठेवण्यात आले. या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप नसावा म्हणून कठोर कायदे तयार करण्यात आले.कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोठा फौजफाटा उभारण्यात आला. मंत्रालय, सचिवालय, वनपाल, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, रेंजर अशी विविध पदे निर्माण करण्यात आली. त्याच्या दिमतीला असणाऱ्या मोटारी, वेतन व भत्ते यावर वारेमाप खर्च करण्यात येऊ लागला. परंतु वाघ सोडून मानवानेच आता तृणभक्षी प्राण्यांचे मांस खाणे सुरु केले आहे. त्यामुळे त्याची संख्या कमी झाली. पर्यायाने याचा प्रभाव वाघ, सिंह यांच्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांवर होऊन त्यांची संख्या घटत आहे. यामुळे हे प्राणी वारंवार गांवामध्ये शिरत असून नाहक मारले जात आहेत.नैसर्गिक अन्नसाखळीतील प्राण्यांना जगण्यामण्याचा अधिकार असून जंगलातील सर्वच प्राण्यांचे रक्षण करणे आपले सामाजिक दायित्व आहे. ते पार पाडण्याची गरज आता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत होत आहे घट
By admin | Updated: July 15, 2015 02:15 IST