गोंदिया : कोरोनाच्या संकटाने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. कोरोनामुळे माणसाचे मरणे किड्यामुंग्यासारखे झाल्याचे विदारक चित्र समाजात उभे आहे. तरीही कोरोना योद्धा म्हणून शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण अद्याप मिळालेले नाही. ते देण्यात यावे म्हणून शिक्षकांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्र्याच्या नावे पत्र पाठविले आहे. कोरोना विरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे. त्यासाठी कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तेवढे संरक्षण शिक्षकांनाही देण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
शासन निर्णयानुसार कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य कर्मचारी, रोजंदारी कंत्राटी मानसेवी असे सर्व कर्मचारी अशा सर्व घटकांना ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र, यात शिक्षकांचा समावेश नाही. या कार्यामध्ये राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, कंटेन्मेंट झोनमधील गावांतील चेक पोस्टचे काम, प्रमुख रस्त्यावर पोस्टचे काम, लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या नोंदीचे काम, रेशन दुकानावर वाटपासाठी मदत करणे, वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये विविध संकलन करणे, जागृतीचे काम करणे, आदी कामांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्तव्य पार पाडताना काही शिक्षकांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब पोरके झाले आहे. त्यांचा आधार हरवल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्धा शिक्षकांना देखील ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील दहा शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला. परंतु, एकाही कुटुंबाला लाभ मिळाला नाही.
....................
कोरोना साथरोग मोहीम
कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत जिल्ह्यातील शिक्षक - २१२२
कोरोनाने शिक्षकांचा मृत्यू - १०
कुटुंबीयांना विमा मिळाला - ००
.......
कोट
आमच्यापर्यंत पाच शिक्षकांचे प्रस्ताव आले आहेत. त्यातील त्रुट्या दूर करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार काम केले जाईल. एकोडी येथील एका परिचराला विमा मंजूर झाल्याचे पत्र आम्हाला मिळाले आहे.
- बाबूराव पारधी, उपशिक्षणाधिकारी जि. प. गोंदिया.
......................
मोहिमेत काम करणाऱ्या शिक्षकांचा कोट
कोरोना विरुद्धची लढाई सुरू आहे. त्यासाठी कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योध्द्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तेवढे संरक्षण शिक्षकांनाही देण्यात यावे.
- प्रकाश ब्राम्हणकर, शिक्षक आमगाव......
......
कोरोनाच्या लढाईत फ्रंटवर्कर म्हणून शिक्षकही काम करतात. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही कोरोना योद्धा म्हणून ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे, शिक्षकांसाठीच शासन वेगवेगळ्या अट ठेवत आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही विमा लागू करावा.
वीरेंद्र कटरे, शिक्षक गोंदिया.
........
कोरोनाच्या संकटात शिक्षक जिवाची पर्वा न करता कामे करतात. परंतु, त्यांना कोरोना योद्धा म्हणून ५० लाखांचा विमा देण्यास शासन मागेपुढे पाहत आहे. सरसकट इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे.
- किशोर बावणकर, शिक्षक सडक-अर्जुनी.