पारडी येथील प्रकार : शिक्षकाला अटक दिघोरी (मोठी) : येथून जवळच असलेल्या पारडी येथील एका शाळेच्या शिक्षकाने दहावीतील विद्यार्थ्याला सोमवारी सायंकाळी शाळेत नेऊन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या चपळतेमुळे ही घटना टळली. विकास सुभाष शिवरकर (३५) असे या सहाय्यक शिक्षकाचे नाव आहे. सदर प्रकार या विद्यार्थ्याने पाल्यांना सांगितला. त्यानंतर पाल्यांनी शिक्षकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सदर शिक्षकाने अगोदरच तिथून पळ काढला होता. मंगळवारी सकाळी शाळा उघडण्यात आली. तेव्हा सुद्धा विकास शिवरकर हा रजेवर असल्याचे कळले. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. शिवरकर याने केलेल्या गैरकृत्यामुळे पारडी गावात संतप्त वातावरण आहे. त्यामुळे प्राचार्य वाय.बी. खोब्रागडे यांनी या प्रकाराबाबत दिघोरी पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार बी.जे. यादव यांनी पो. हवालदार तलमले, पुंडलीक कठाणे, प्रमोद बागडे, अरकासे यांच्या समवेत पारडी येथून विकास शिवरकरला अटक केली. पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी आवाहन केल्यामुळे गावकरी शांत झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी दुपारी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शिवरकरविरुद्ध भादंवि ३७७, ५११ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांशी अनैसर्गिक कृत्याचा शिक्षकाचा प्रयत्न
By admin | Updated: August 11, 2016 00:20 IST