गोंदिया : प्राथमिक शिक्षक मार्च-२०२० पासून कोविड १९ अंतर्गत विविध सेेवेत कार्यरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही पन्नास लाखाचे विमा कवच शासनाने लागू केले आहे. या दरम्यान कोविड सेवेत असतांना मृत झालेल्या शिक्षकांच्या परिवाराला मात्र अद्याप क्लेम मिळाले नाही. अशा पीडित शिक्षक परिवारांना त्वरित विम्याचे क्लेम देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाने शिक्षकांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असताना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र क्लेम मिळाले आहेत हे विशेष. म्हणजे कामाच्या वेळी कामाला लावून मृत्यू झाल्यास पाठ फिरवणे असा प्रकार शिक्षकांबाबत घडतांना दिसून येत आहे. यापैकी कोणालाच ५० लाखाचे विमा क्लेम मिळाले नाही, असे त्यांच्या परिवाराच्यावतीने सांगण्यात आले आहे.