अर्जुनी मोरगाव : राज्यात कोरोनाचे संकट ओढवले आहे. विधानसभा मतदारसंघात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा संकटसमयी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले. त्यांनी शुक्रवारी स्थानिक ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली.
राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूंचा मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू आहे. कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाला आहे. बाधित रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णवाढीमुळे रुग्णालयात बिछाने व जागा शिल्लक नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच दमछाक होत आहे. या संकटाचा सामना करण्याचे मोठे आव्हान जनतेसमोर आहे.
आ.चंद्रिकापुरे यांनी कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळवून दिली. या रुग्णवाहिकेचा वापर कोविड रुग्णांसाठी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदार निधीतून एक कोटी रुपये दिले. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना ८९ ऑक्सिजन कॉन्स्ट्रनटेटर व १२ व्हायटल साईन मॉनिटर ही वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. येत्या दोन-तीन दिवसात ही कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक कोविड केअर सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. सध्या येथे ३८ ऑक्सिजन सिलिंडर असून, यापैकी ८ पूर्ण भरलेले सिलिंडर असल्याची माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे यांनी दिली. कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या औषध पुरवठ्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.
तालुका मुख्यालयापासून लांब अंतरावर असलेल्या केशोरी व ईळदा येथे कोविड केअर सेंटर स्थापनेसाठी तहसीलदार विनोद मेश्राम यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्याच्या सूचना केल्या. या सेंटरसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
.......
रुग्णांशी साधला संवाद
त्यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांना प्रकृतीची व उपलब्ध सेवेची विचारपूस केली. कोरोना काळात रुग्णांची हयगय होता कामा नये, अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. आजच आपण गोंदियाला जाऊन आणखी वैद्यकीय सुविधा वाढवून व रुग्णांना अद्ययावत सेवा मिळण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.