गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी केले आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२१-२२ करिता राबविण्यास शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघातामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच त्यांचा कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. योजनेचा कालावधी ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२० असा आहे. सदर योनजेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.