विभागीय आयुक्ताकडे तक्रार : पं.स.सदस्य गजभिये यांचा उपोषणाचा इशारा तिरोडा : इंदोरा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार कृष्णकुमार तेजलाल पटले हे स्वस्त धान्य दुकान चालवत नसून त्यांनी सदर दूकान भाड्याने नातेवाईक तुळशीदास पुरणलाल पटले (मु.इंदोरा खुर्द) यांना अनधिकृतपणे चालविण्याकरिता दिली आहे. पटले दुकान नियमानुसार चालवीत नसून याची चौकशी करुन सामान्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्या संध्या भरणे यांनी केली असून त्यांनी प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सदर रेशन दुकानदार शिधापत्रिका धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे धान्याचे वाटप करीत नाही. उलट रेशन कार्डधारकांना धमकावतो. याबाबत ९० कार्डधारकांच्या स्वाक्षऱ्या घेत तहसीलदारांकडे तक्रार केली. पण तहसीलदार, स्वस्त धान्य निरीक्षक, पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांशी संगणमत करुन कोणतीही कार्यवाही केली नाही. तर अर्जदारांच्या डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या धान्य पुरवठा करण्याची दुसऱ्या परवानाधारकापासून सुविधा आजपर्यंत केली नाही. सदर दुकानदाराचे राजकीय पक्षाशी संबंध असून त्यांच्याबाबत अनेक तक्रारी होऊनही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. रेशन दुकानदाराचे साठा रजिस्टर, बी १ व बील बूक, दक्षता समितीची प्रोसिडींग, बिल बुकावर मारलेल्या सह्या, दर महिन्याला दक्षता समितीमार्फत साठा निरंक होण्याचे प्रमाणपत्र व बिल बूकावर ग्राहकांद्वारे मारलेल्या सहिची चौकशी करण्यात यावी व कार्डधारकांना नोटीस देऊन त्यांच्या गावात जावून बयान घेण्यात यावे. अपंग व्यक्ती टेकलाल फंदाजी पारधी या व्यक्तीचा रेशन दुकानदारांनी कार्ड फाडले असून त्यावर त्वरित कार्यवाही करावी यासाठी याबाबत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात सदर प्रकरणाची योग्य चौकशी करुन संबंधित रेशन दुकानदारावर कार्यवाही न केल्यास गावकरी व तक्रारकर्ते आमरण उपोषण करतील याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांची राहील असा इशारा पंचायत समिती सदस्य गजभिये यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)
रेशन दुकानदारावर कारवाई करा
By admin | Updated: December 28, 2016 02:45 IST