आरोग्यमंत्र्यांचे निर्देश : रुग्णालयाचे छत कोसळल्यानंतर जागे झाले प्रशासनदेवरी : महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर असलेल्या संवेदनशील, नक्षलग्रस्त आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे अनेक वर्षांपासून प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. गेल्या आठवड्यात इमारतीच्या छताचा जीर्ण भाग कोसळल्यानंतर आ.संजय पुराम यांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यामुळे मंत्र्यांकडून निर्देश मिळताच आरोग्य यंत्रणा जागी झाली आणि आरोग्य उपसंचालकांनी देवरीकडे धाव घेऊन ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेची पाहणी केली.रुग्णालयाच्या इमारतीला ३४ वर्ष पूर्ण झाली. त्यात इमारतीची देखभाल पाहीजे तशी नाही. त्यामुळे इमारत जीर्ण होऊन छताचे पोपडे खाली पडत आहेत. यातून केव्हाही जिवीत हाणी होऊ शकते. तसेच येथे ड्रामा सेंटर असताना त्याची सुद्धा इमारत जीर्ण होत आहे. चार दिवसांपूर्वी छताचा काही भाग कोसळला. यामुळे आमदार संजय पुराम यांनी त्वरित ग्रामीण रुग्णालय देवरीला भेट देऊन इमारतीची पाहणी केली व रुग्णालयाची ही अडचण राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर दि.२६ ला मांडली. ना.सावंत यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करुन निर्देश योग्य पाऊस उचलण्याचे निर्देश दिले. यामुळे नागपूरचे विभागीय उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, एन.एच.एम.चे कार्यकारी अभियंता लोंढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वासनिक, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सविता पुराम, नगरसेवक यादोराव पंचमवार, कौशल्या कुंभरे, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक धुमनखेडे, सामाजिक कार्यकर्ते यावेळी चंचल जैन उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे निरीक्षण करुन सकारात्मक उत्तर देत लवकरात लवकर नवीन इमारतीचा आराखडा व अंदाजपत्रकीय प्रस्ताव शासनाला पाठवू असे सांगितले. यावरुन देवरी येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त रुग्णालय निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य उपसंचालकांकडून पाहणी
By admin | Updated: September 30, 2016 01:54 IST