सडक-अर्जुनी : शासनाने लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले, आदी लोकांकरिता आर्थिक सहाय्य जाहीर केले. परंतु, बलुतेदार असलेले नाव्ही, सुतार, शिंपी, कुंभार, लोहार, परीट यांसारख्या बारा बलुतेदारांनाही आर्थिक सहाय्याची गरज आहे. त्यांनाही आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे तालुका सचिव राजेश कठाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
५ एप्रिल २०२१ पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन कायात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही नियम व अटीनुसार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. तसेच ऑटोरिक्षा चालक व बांधकाम मजूर आणि फेरीवाले यांना आर्थिक सहाय्य देण्याचेही ठरविण्यात आले. परंतु नाव्ही, सुतार, शिंपी, कुंभार, परीट यांचेही व्यवसाय बंद झाले. त्यामुळे हे बलुतेदारही आर्थिक अडचणीत आले आहे. त्यांचीही उपासमार सुरू झाली आहे. म्हणून राज्य सरकारने त्यांनाही आर्थिक सहाय्य द्यावे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष उमाकांत ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी तालुका सचिव राजेश कठाणे यांनी तहसीलदार सडक-अर्जुनी यांना पत्र दिले आहे.