आमगाव : महिला सशक्तीकरण करून महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक त्या सर्व योजना व त्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपले सदैव प्रयत्न राहतील. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे जीवनमान अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सीमा कोरोटे यांनी केले.
तालुका महिला काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हळदीकुंकू व महिला मेळावा रविवारी आमगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. आमदार सहसराम कोरोटे, सीमा कोरोटे, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, माजी महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, महिला आमगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष छबू उके, शुभांगी फुंडे, उषा भांडारकर, अरुणा बहेकार, ममता पाऊलझगडे, माजी सभापती हेमलता डोये, महिला शहर अध्यक्ष प्रभा उपराडे उपस्थित होत्या. या वेळी मार्गदर्शन करताना आ. कोरोटे यांनी शासनाच्या वतीने महिलांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्यांचा विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा येरणे यांनी केले. मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.