गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या बेरडीपार जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक नेतराम लक्ष्मण माने यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कारणे दाखवा नोटीस न देता अकारण निलंबित करण्यात आले. याची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित होताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जि.प.चे शिक्षण विभाग गाठून निलंबनाचे कारण विचारले व ठिय्या ठोको आंदोलन केले. मात्र शिक्षणाधिकारी पाटील यांनी बनवाबनवीची उत्तरे देऊन कार्यालयातून पळ काढल्याची माहिती प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिली.प्राप्त माहितीनुसार, शिक्षक माने यांना सामाजिक कार्यात रूची असल्याने ते समाजसेवासुद्धा करतात. तिरोडा कृषी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी उघड केले. एका जि.प. सदस्याचे (सभापती) नातलत त्या कृषी विभागात आहेत. त्यांची केलेली तक्रार शिक्षक माने यांनी मागे घेतली नाही. भ्रष्टाचार उघड होवू नये यासाठी जि.प. सभापती व शिक्षणाधिकारी पाटील यांच्यात आर्थिक लेनदेन झाल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. प्रकरण दडपण्यासाठी सदर शिक्षकाला पत्रकार दाखवून निलंबित करण्यात आले. मात्र लोकमतच्या संपादकाकडून कोणतेही पुरावे शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितले नाही. तसेच सदर शिक्षकाला निलंबित करण्यापूर्वी कोणतेही कारणे दाखवा नोटीसही बजावले नाही. दलित शिक्षकावर झालेल्या या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गजभिये यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिक्षणाधिकारी कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी ठिय्या ठोको आंदोलन केले. मात्र शिक्षणाधिकारी पाटील यांनी बनवाबनवीची उत्तरे देवून पळ काढला. कार्यकर्ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत त्यांची वाट पाहत होते, मात्र ते परतले नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी २२ सप्टेंबरला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय गाठले.
अन्यायाविरोधात ‘प्रहार’चे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: September 27, 2015 01:22 IST