रोजगार हमीच्या कामांमुळे दिलासा : नक्षलग्रस्त टोयागोंदीत सर्वाधिक कामेसालेकसा : मनरेगा अंतर्गत सर्वात जास्त विकास कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या टोयागोंदी ग्रामपंचायतमध्ये नुकताच पुन्हा एक कोटीच्या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील भूमीहिनांसाठी मनरेगा वरदान ठरली असून यातूनच टोयागोंदीचा कायापालट होणार आहे. जिल्ह्याच्या पूर्वी टोकावर असलेले टोयागोंदी हे गाव महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सिमेवर आहे. टोयागोंदी या ग्रामपंचायत अंतर्गत टोयागोंदी, चांदसूरज, सोईरटोला, बेवारटोला, बडटोला, विचारपूर, डुबरुटोला, कोपालगड, दल्लाटोला, तुडमुडी चौकी इत्यादी सर्व गावे आणि टोले हे छत्तीसगड सीमेवर पर्वत रांगेच्या पायथ्याखाली असून आहे. हा संपूर्ण परिसर डोंगराळ अतिदुर्गम संवेदनशील नक्षलग्रस्त भागात आहे. या क्षेत्रात राहणारे लोक गरीब आदिवासी व अति मागासलेले मोल मजूरी करणारे आहेत. जवळपास ७० तर ८० टक्के लोक भूमिहीन मजूर असून मजूरी शिवाय दुसरे कोणते काम व साधन त्याच्याकडे उपलब्ध नसल्याने अशा लोकांसाठी मनरेगा अंतर्गत मिळणारे रोजगार एक वरदान ठरते. सरपंच गीता ओमप्रकाश लिल्हारे यांच्या सक्रियतेमुळे नागपूर विभागात सर्वात जास्त मनरेगाची कामे करण्याचा विक्रम टोगायोंदी ग्रामपंचायतने केला आहे. त्याबद्दल मागील वर्षी नागपूर येथे या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले. याची प्रेरणा घेऊन पुन्हा यावर्षी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तलाव खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आले. येणाऱ्या दिवसात आणखी मनरेगाची कामे सुरु होणार असून मजुरांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही सरपंच गीता लिल्हारे यांनी दिली. याप्रसंगी ग्रामपंचायतच्यावतीने सतत मनरेगाची कामे उपलब्ध होत असल्याबद्दल मजूर महिला-पुरुषांनी समाधान व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)तलाव खोलीकरणाने प्रारंभ ग्रामपंचायत टोयागोंदी अंतर्गत विचारपूर येथे तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच गीता लिल्हारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच किशोर केकति, ओमप्रकाश लिल्हारे, नंदकिशोर बनोठे, मनोहर खुडसाम, विष्णू लिल्हारे, प्यारी सोरी, गंगाराम खुडसिंगे, जितेंद्र लिल्हारे, राजेंद्र रतोने, अनिल बसेना, संतलाल शाहू, पुरुषोत्तम वाढई, शशीकला टेकाम, रत्नकला पटले, नारायण पंधरे, शालीक लिल्हारे, श्रावण औरासे, रामेश्वर लिल्हारे व गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
एक कोटीच्या कामांना सुरूवात
By admin | Updated: April 14, 2017 01:50 IST