देवरी : बेरोजगारीच्या समस्येला घेऊन येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व संबंधित अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे जास्त प्रमाणात त्वरित सुरू करण्यास आ.सहषराम कोरोटे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
देवरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कमीतकमी चार नवीन कामे त्वरित सुरू करा, अपूर्ण कामे त्वरित मार्गी लावा. कोरोना विषाणू संसर्गाविषयी प्रतिबंधक उपाययोजना बद्दल मार्गदर्शन आणि २५ लाख रुपयांच्या वरील कामांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणे अशा अनेक विषयांवर उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून ही कामे मार्गी लावण्यास सांगितले. तहसीलदार विजय बोरुडे, देवरीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, देवरीचे वन परिक्षेत्र अधिकारी महेश चोपडे यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.