गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्य शासनाने महाराष्ट्रातील एसटीला परवानगी नाकारली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच छत्तीसगड राज्यात जाणारी गोंदिया आगारातील फेरी सुरू झाली होती. मात्र मध्यप्रदेश शासनाने परवानगी नाकारल्याने तेथे जाणाऱ्या गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारांतील फेऱ्या बंद होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यात मध्यप्रदेश शासनाने परवानगी दिल्यानंतर आता दोन्ही आगारांतील फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यात या फेऱ्यांना प्रवासी प्रतिसाद असल्याने आगारांच्या उत्पन्नातही भर पडणार यात शंका नाही.
----------------------------------
१) परराज्यात जाणाऱ्या बसेस
गोंदिया -बालाघाट
गोंदिया- मलाजखंड
गोंदिया- छिंदवाडा
गोंदिया- डोंगरगड
तिरोडा- बालाघाट
------------------------------
डोंगरगड व नागपूर-छिंदवाडा गाड्यांना चांगला प्रतिसाद
गोंदिया आगारातील गाडी छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे जात असून सोबतच मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा येथे नागपूर होत जात आहे. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. छिंदवाडा येथे रेल्वे सेवा नसल्याने व डोंगरगडसाठी एसटीची एकच फेरी असल्याने प्रवासी एसटीला प्राधान्य देतात.
---------------------------------
९० टक्के वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून या दोन्ही आगारांतील सुमारे ९० टक्के चालक-वाहकांनी आपले लसीकरण करवून घेतले आहे. यात काहीचा पहिला तर काहींचा दुसरा डोस झाला आहे. विशेष म्हणजे, एसटीमध्ये ड्युटी करताना कित्येक नागरिकांचा संपर्क येत असून त्यांच्यापासून धोका स्वत:ला धोका होऊ नये, तसेच आपल्यापासून त्यांना धोका होऊ नये यासाठी चालक-वाहक सजग असून त्यांनी लसीकरण करवून घेतले आहे.
------------------------------------
आगारासाठी फायदेशीर
एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हापासून छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील एसटीच्या फेऱ्या बंद होत्या. मात्र छत्तीसगड राज्यातील फेरी लगेच सुरू झाली होती. तर मध्यप्रदेश शासनाने ऑगस्ट महिन्यात परवानगी दिल्यानंतर फेऱ्या सुरू झाल्या आहेत. आगारासाठी फायद्याचे असून आगाराच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया.