बोंडगावदेवी : धाकट्या बहिणीचा संसार उभारण्यासाठी धडपडत मोठ्या उत्साहाने तिच्या लग्नाची तयारी करीत असलेल्या मोठ्या भावावर बहिणीचा संस्कार पाहण्याआधीच प्राणज्योत गमविण्याची वेळ आली. ही दुर्दैवी घटना जवळच असलेल्या चान्ना-बाक्टी या गावी घडली. आपल्या कुटूंबाची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या ३३ वर्षीय मृतक अविवाहित युवकाचे नाव देवेंद्र रामटेके असे आहे. घरात एकुलता एक मुलगा असणाऱ्या देवेंद्रवर संपूर्ण कुटूंबाचा भार होता. आपल्या पाठीमागच्या धाकट्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी स्वत: घेऊन नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण देताना नियतीने डाव साधला. परसोडी (नागाची) येथे एका नातलगाच्या घरी एकाकी भोवळ येवून देवेंद्र खाली कोसळला. नागपूरला एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना सोमवारच्या रात्री ११ वाजता देवेंद्रची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे चान्ना गावावर दु:खाचे सावट कोसळले. शामराव रामटेके यांचा देवेंद्र हा एकुलता एक मुलगा. वयोमानानुसार आई-वडील थकलेले असल्याने कुटूंबाचा भार देवेंद्रवर होता. अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये संगणक चालक म्हणून काम करून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. आपल्या पाठीमागच्या धाकट्या बहिणीच्या लग्न समारंभाची जबाबदारी त्याचेवरच होती. मे महिन्याच्या २४ तारखेला विवाह ठरविण्यात आला होता. घरामध्ये कर्ता-धर्ता असल्याने सुटीच्या वेळात लग्नपत्रिका वाटणे त्याची जबाबदारी होती. रविवारला (दि.९) लाखांदूर जवळील परसोडी येथे लग्नकार्याबरोबर पत्रिका वाटायला गेला होता. तिथेच एकाएकी भोवळ येवून देवेंद्र कोसळून खाली पडला. लगेच दवाखान्यात नेण्यात आले परंतु डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याला नागपूरला हलविण्यात आले. अखेर सोमवारच्या रात्री त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजता चान्ना येथे अंतिम संस्कार करण्यात आले. धाकट्या बहीणीला विवाह बंधनात अडकवून आशीर्वाद देण्यापूर्वीच क्रूर काळाने देवेंद्रवर घाला घातला. निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
बहिणीच्या लग्नतयारीत भावाने गमविले प्राण
By admin | Updated: April 13, 2017 01:59 IST