गडचिरोली : शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या अधीक्षक व महिला अधीक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी अधीक्षक व महिला अधीक्षक संघटनेच्या वतीने गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दशरथ कुळमेथे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.अधीक्षक व महिला अधीक्षिकांना सार्वजनिक सुटीच्या दिवशीही काम करावे लागते. त्यामुळे या दिवसाचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, समाजकल्याण विभागातील आश्रमशाळेच्या अधीक्षकाप्रमाणे ग्रेड पे व मूळ वेतनश्रेणी देण्यात यावी, गृहपाल या पदावर अधीक्षक व महिला अधीक्षकांना ७५ टक्के पदोन्नती देण्यात यावी, आश्रमशाळांमधून वसतिगृह विभाग वेगळा करण्यात यावा, अधीक्षकांना स्वतंत्र आहरण व संवितरणाचे अधिकार देण्यात यावे, आश्रमशाळेतील वसतिगृहाची भोजन पद्धती कंत्राटी पद्धतीने ई-निविदा काढून चालवावी, अधीक्षकांना सहाय्यक कर्मचारी म्हणून कनिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, सहाय्यक अधिक्षिका व भांडारपाल ही पदे मंजूर करावी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवारातील संरक्षण भिंतीची उंची वाढवावी, एकच प्रवेशद्वार ठेऊन प्रवेशद्वारावर चौकीदाराची नेमणूक करावी, या चौकीदाराच्या मार्फतीने आश्रमशाळेत ये-जा करणाऱ्यांची नोंद ठेवण्यात यावी, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्याचबरोबर आजारी मुलांसाठी सिकरूम बांधण्यात आले आहेत. या सिकरूममध्ये विद्यार्थ्यांच्या तपासणीकरिता डॉक्टर व परिचारिकेची नेमणूक करावी, विद्यार्थ्यांना भेटण्याकरिता येणाऱ्या पालकांना विश्रामगृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी डी. आर. वैद्य, सी. डब्ल्यू. रंगारी, के. एस. जावळे, एच. वाय. धर्मे, जे. एस. लेंगुळे, पी. बी. घाटे, पी. ढवळे, सानप चोपडे, कावळे, तराडे, नागरीकर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अधीक्षकांच्या समस्या सोडवा
By admin | Updated: February 28, 2015 01:38 IST