नवेगावबांध : तालुक्यातील नवेगांवबांध फीडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विजेची समस्या गंभीर झाली आहे. कमी दाबामुळे शेतकरी व उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी नवेगावबांध परिसरातील नागरिकांनी किशोर तरोणे व नवल चांडक यांच्या नेतृत्वात अर्जुनी-मोरगाव वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता अमित शहारे यांना निवेदन दिले.
नवेगावबांध परिसरात मागील दोन महिन्यापासून विद्युत पुरवठ्याच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विद्युत होल्टेज हे ४४० थ्री फेज व २४० सिंगल फेज मिळायला पाहिजे,परंतु मागील काही दिवसापासून थ्री फेजला ३८० व सिंगल फेजला १७० एवढेच होल्टेज मिळत आहे. त्यामुळे कृषी पंप, राईस मिल आणि लहानमोठ्या व्यवसायाला घरघर लागली आहे. नवेगावबांध वीज कार्यालयात या समस्यांबाबत विचारणा केली असता तिथला कुठलाही जबाबदार अधिकारी व कर्मचारी उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अभियंता अमित शहारे यांच्याकडे धाव घेऊन आपल्या समस्या सांगितल्या. तसेच प्रत्यक्ष लक्ष देऊन नवेगावबांध परिसरातील विद्युत समस्या मार्गी लावावे. या समस्या आठ दिवसात मार्गी लागल्या नाही तर आम्ही शेतकरी व उद्योजक नवेगावबांध टी. पॉईंट येथे आंदोलन करणार, असा इशाराही निवेदनातून दिला. शिष्टमंडळात माजी जि.प. सदस्य किशोर तरोणे, उद्योजक नवलकिशोर चांडक, राजेश शाहू, ईश्वरदास सांगोळकर, प्रकाश कुसराम, ओमकार राठोड, नीलेश मुनेश्वर, प्रवीण गजापुरे, विशाल पुस्तोळे उपस्थित होते.