परसवाडा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत येणाऱ्या परसवाडा येथील श्रेणी-१ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पण सदर सिमेंट काँक्रिटचा रस्ता सहा महिन्याच्या आधीच उखडला असून निकृष्ठ बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या १२ व्या पशुसंवर्धन योजनेंतर्गत चार लाख ७७ हजार ८९१ रूपयांचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. हे काम सचिव जगदीश मजूर सहकारी संस्था पांगडीला देण्यात आले. पण सदर संस्थेने न करता पेटी कंत्राटदाराला कमिशनवर विक्री करून दिले. कामाचा आदेश १८ आॅक्टोबर २०१३ ला देण्यात आला होता. पण सदर काम जून-जुलै २०१४ मध्ये करण्यात आला. माहिती तक्त्यावर काम पूर्ण झाल्याचा दिनांकाचा उल्लेखही नाही. संपूर्ण सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ट दर्जाचा असून अत्यंत अल्प प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. या रस्त्याची तपासणी गुण नियंत्रण प्रयोगशाळेमार्फत केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.या ठिकाणी खस्सीकरण करण्यासाठी जागा तयार न करता त्या ठिकाणी मुरूमाचे दगड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जनावरांचे खस्सीकरण करता येत नाही. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे जनावर खाली पाडले असता पायाला दुखापत झाली होती. असे प्रकार अनेकदा येथे घडत आहेत.या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. सदर अंतर्गत सिमेंट रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करू, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. (वार्ताहर)
सहा महिन्यांत सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा
By admin | Updated: November 26, 2014 23:08 IST