गोंदिया : कोविडने जिकडे तिकडे हाहाकार माजविला आहे. यातच प्रत्येकाची आता आपला जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु काही ठिकाणी अजूनही रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे सध्याच्या बिकट स्थितीत तरी हा प्रकार थांबविण्याची गरज आहे. असाच काहीसा प्रकार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये पुढे आला आहे.
कोविडच्या आजारात गंभीर रुग्ण झालेल्यांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन लावून त्यांचे प्राण वाचविण्याचा खटाटोप केला जातो. परंतु मागील पंधरवड्यापासून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचे नोडल ऑफीसर म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे आहेत. परंतु गंभीर रुग्ण मेडिकल कॉलेजमध्ये भरती असल्याने हे रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकलच्या स्वाधीन केले जाते. वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे हे इंजेक्शन हस्तांतरित केले जातात. ते इंजेक्शन अधिष्ठाता मेडिकलमधील आयसीयूमधील ऑनड्यूटी कर्मचाऱ्यांना देतात. रेमडेसिविर इंजेक्शन तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने परिचारिकांनी रुग्णाला लावायला पाहिजे. परंतु ज्या गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यायचे आहे, त्या रुग्णांना इंजेक्शन न देता त्यांच्या औषधोपचार होत असलेल्या चिठ्ठीवर इंजेक्शन दिल्याचे नमूद केले जाते. परंतु प्रत्यक्षात रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन दिलेच जात नाही. हा प्रकार मेडिकलमध्ये १८ एप्रिल रोजी घडला. त्या दिवशी दुपारी २ वाजता ही बाब उघडकीस आली. योगेश गिऱ्हेपुंजे नावाच्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांनी लिहून दिले, फोनही केले. परंतु ड्युटीवर असलेल्या नर्सने त्यांना इंजेक्शन दिलेच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी यासंदर्भात त्या नर्सला म्हटल्यावर तिने इंजेक्शन न लावताच इंजेक्शन लावल्याचे सांगितले. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही इंजेक्शन लावलेच नाही, दारातून आम्ही टक लावून पाहात आहोत असे म्हटले. याची तक्रार अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांच्याकडे रुग्णाच्या नातेवाईकाने व स्वत: माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर त्या परिचारिकेने रुग्णाला इंजेक्शन लावले. असा गंभीर प्रकार सध्या सुरू आहे.
बॉक्स
ते इंजेक्शन रेमडेसिविर की दुसरे...
१८ एप्रिल रोजी रेमडेसिविर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात आले, ते इंजेक्शन रुग्णांना देण्यासाठी वॉर्डातही पाठविण्यात आले परंतु वॉर्डात आलेले इंजेक्शन परत बाहेर गेले का याचीही चौकशी केल्यास रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रत्येक वाॅर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे.
.....