सालेकसा : मागील दोन महिन्यांपासून धान विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्राच्या चकरा मारत आहेत. पण अद्यापही धान खरेदी केली जात नसल्याने साहेब आमचे धान खरेदी करा, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला दुर्गा तिराले, गोपाल तिराले, दौलत अग्रवाल, प्रा. जियालाल पटले, कमलेश लिल्हारे यांच्यासह ५० शेतकरी उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील हजारो शेतकरी आपला खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी जात आहे, तर दुसरीकडे गुदाम भरले आहे. आधी खरेदी केलेल्या धानाची उचल झाल्याशिवाय धान स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्राने घेतली आहे. परिणाम निंबा व रोंढा येथील जवळपास ३०० शेतकरी धान विक्रीसाठी दुहेरी संकटात सापडले आहेत. निंबा हे गाव सालेकसावरुन दाेन कि.मी.अंतरावर असले तरी या गावच्या शेतकऱ्यांना २० किलोमीटर दूर असलेल्या कोटजंभुरा येथील धान खरेदी केंद्रावर पाठविले जाते. अशात शेतकऱ्यांनी धान कुठे विकावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. निंबा येथील शेतकऱ्यांनी दुर्गा तिराले यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. धान मळणी होऊन दोन महिने पूर्ण झाले तरी धान विक्री करता आली नाही. खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज परत करणे, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कार्य यांसारखे मोठे खर्च करायचा कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
धान खरेदी केंद्र गायब
काही दिवसांपूर्वी निंबा येथे स्थानिक आमदारांच्या हस्ते नवीन धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. मात्र १५ दिवस लोटूनही शेतकऱ्यांचा एक किलो ही धान खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे हे केंद्रच गायब झाले काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला.
....
निंबा गावाला आदिवासी धान खरेदी केंद्रात समाविष्ट करा
निंबा हे गाव पूर्णपणे आदिवासी भागात वसलेले असून सुद्धा एकतर या गावाची गणना आदिवासी गावामध्ये केली जात नाही. त्यावर येथील गरीब शेतकऱ्यांना आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर आपला धान सुद्धा विकता येत नाही. त्यामुळे निंबासह इतर गावांना आदिवासी सोसायटीच्या धान खरेदी केंद्रावर आपला धान विक्री करण्याची संधी मिळावी अशी मागणी दुर्गा तिराले यांनी केली.