रास्ता रोको आंदोलन : मोर्चा व नारेबाजीतून केला शासनाचा निषेध गोंदिया : केंद्र शासनाने लावलेला एक टक्के अबकारी कर (एक्साईज ड्युटी) मागे घेण्याच्या मागणीवर शासनाने गेल्या महिनाभरात काहीच निर्णय न घेतल्याने अखेर सराफा व्यवसायिक शनिवारी रस्त्यावर उतरले. गोंदिया सराफा असोसिएशनच्यावतीने शहरात मोर्चा काढून शासनाचा निषेध करीत आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करून त्यांनी आपला रोष व्यक्त केला.नवीन कर मागे घेण्याच्या मागणीसाठी सराफा व्यवसायिकांनी मागील २ मार्चपासून बंद पुकारला आहे. आता त्यांच्या आंदोलनाला महिना लोटला असला तरीही शासनाने त्यांच्या मागणीवर काहीच निर्णय घेतला नाही. आपल्या या आंदोलनांतर्गत सराफा व्यवसायिकांनी चहा-पोहे, भजी विकून तर जिल्ह्यात काही ठिकाणी भाजीपाल्याचे दुकान लावून अनोख्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधले. गांधीगिरीच्या माध्यमातूनही काहीच लाभ मिळाला नाही. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचा बंद सुरूच आहे. दरम्यान आपल्या मागणीवर ठाम असलेल्या सराफा व्यवसायिकांनी गोंदिया सराफा असोसिएशनच्या माध्यमातून शनिवारी (दि.२) सायंकाळी शहरात मोर्चा काढला. दुर्गा चौकातून निघालेला मोर्चा गांधी पुतळा चौक, जयस्तंभ चौक, नेहरू चौक मार्गे दुर्गा चौकात समाप्त करण्यात आला. या मोर्चातून सराफा व्यवसायीकांनी नारेबाजी करीत शासनाच्या एक्साईज ड्युटीच्या निर्णयाचा निषेध केला. (शहर प्रतिनिधी)बाहेरील व्यवसायी संघटना झाल्या सहभागी गोंदिया सराफा असोसिएशनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चा व रस्ता रोको आंदोलनात आमगाव तालुका, तिरोडा तालुका, गोरेगाव तालुका तसेच लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट व लांजी येथील सराफा व्यवसायिकांच्या संघटनाही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे गोंदिया व बाहेरून आलेल्या संघटनांतील सराफा व्यवसायी मिळून सुमारे ३०० सराफा व्यवसायी आंदोलनात सहभागी झाले होते. आंबेडकर चौकात रास्ता रोको मोर्चा आंबेडकर चौकात आल्यानंतर सराफा व्यवसायिकांनी सुमारे १५ मिनीटे रस्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी आंदोलकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर बसून नारेबाजी करीत वाहतूक अडविली होती. विशेष म्हणजे सराफा व्यवसायीकांच्या भावना बघता उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सराफा व्यावसायिक उतरले रस्त्यावर
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST