गोंदिया : शहरातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डान पुलाच्या लोकार्पणाआधी आंबेडकर चौकातील वळते केलेले दोन मार्ग पुन्हा ‘जैसे थे’ केले जाणार आहेत. त्यासाठी या चौकात आधी सिग्नल लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.रेल्वे उड्डाण पूल तयार झालेला असताना त्या पुलाच्या डॉ.आंबेडकर चौकातील एका टोकामुळे अनेक दिवसांपासून वादळ उठले आहे. पुलाचे एक टोक या ठिकाणी नको होते यापासून तर त्या ठिकाणी टाकलेले रस्ता दुभाजक, डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या मागील आणि पुढील बाजुचे दोन मार्ग चौकातून आरपार बंद करून ते वळते करण्याच्या निर्णयावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घडामोडींमुळे हा पूल काहीसा वादग्रस्त ठरू पाहात आहे. परंतू त्यातून मार्ग काढण्यासाठी आता रस्ता सुरक्षा समिती पर्याय काढणार आहे.या पुलाच्या दक्षिण टोकावरील आंबेडकर चौकातील पूर्व-पश्चिम मार्ग रस्ता दुभाजक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनाही आता मोठा फेरा घेऊन जावे लागत आहे. या पुलावरून वाहतूक सुरू केल्यानंतर आंबेडकर चौकाकडील बाजुने पुलावरून उतरणारी वाहने वेगात येणार असल्यामुळे चौकात अपघात होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तूर्त तहसील कार्यालयाकडून मारवाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्ता आंबेडकर चौकात आडवे रस्ता दुभाजक टाकून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना जयस्तंभ चौक आणि नेहरू चौकात जाऊन फेरा घेऊन यावे लागत आहे. या त्रासाकडे ‘लोकमत’नेसुद्धा लक्ष वेधले होते. त्यामुळे लवकरच यावर तोडगा काढला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आंबेडकर चौकात लागणार सिग्नल
By admin | Updated: June 21, 2014 01:46 IST