चुकाऱ्यासाठी पैसे नाही : शेतकरी उधारीवर धान देण्यास तयार नाही आमगाव : सतत तीन-चार दिवसांपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीमुळे व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. शेतकरी उधारीत धान देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांनाही चणचण सहन करावी लागत आहे.जुन्या मोठ्या नोटा चलनातून बंद केल्याने याची झळ व्यापारी, शेतकरी, शेतमजुरांना बसली आहे. व्यापाऱ्याकडे पैसे नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा आलेला धान बोलीवर विकत घेता येत नाही. बोली झाली तर शेतकऱ्यांना चुकारा पाहिजे, पण व्यापाऱ्याकडे असलेल्या नोटा चलनातून बाद झाल्याने मोेठे संकट उभे झाले आहे. पाचशे किंवा हजाराच्या नोटा शेतकरी घेण्यास तयार नाहीत तर बँकेत जमा करून बदल्यात दुसऱ्या नोटा बँकेतून पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे तेवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलीनंतर व्यापारी चार-पाच दिवसांनी पैसे देण्यास तयार असले तरी शेतकऱ्यांला पूर्ण पैसे मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी आपला धान उधारत्त देण्यास तयार नाही. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या खरेदी विक्री ठप्प पडून शुकशुकाट दिसत आहे. शेतकऱ्यांना याचा त्रास होत असला तरी त्याबाबत त्यांची फार कुणकुण नसल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
आमगाव बाजार समितीत शुकशुकाट
By admin | Updated: November 13, 2016 01:08 IST