लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे मागील तीन दिवसांपासून कोरोनावरील लस संपली असून लोक दररोज लसीकरणासाठी येऊन परत जात आहे. लस केव्हा मिळेल असा एकच प्रश्न विचारत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे.प्राथमिक आरोग्य केद्र कावराबांध अंतर्गत जवळपास ३१ हजार लोकसंख्येचा समावेश आहे. तालुक्यातील एक तृतीयांश लोकसंख्येचा समावेश आहे. मागील १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वयोगटातील सर्वांना लसीकरण सुरु झाले असल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली, अशात लसीचा साठा वाढविण्याची गरज आहे. लसीकरण सुरु करताना या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका दिवसात शंभर लोकांना लस देण्याचे नियोजन केले. सुरुवातीला उद्दिष्टापेक्षा फार कमी लोक लस घ्यायला येत होते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी लोकांना वारंवार आवाहन करीत होते. तरी सुध्दा लोक घेण्यासाठी स्वत:हून समोर येत नव्हते. अनेक लोक तर लसीकरणाबद्दल अफवांना बळी पडताना सुध्दा पाहायला मिळाले. लस घेतल्याने रक्त गोठते अशी अफवा सुध्दा उडाली होती. परंतु हळूहळू या अफवा दूर झाल्या. तर दुसरीकडे कोरोनाचा संक्रमण वाढत गेला आणि परिसरात कोविड पॉझिटिव्ह लोकाचे प्रमाण झपाट्याने वाढले. या दहशतीमुळे लोकांना आता लस घेण्याची घाई वाढली. अनेकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेण्यासाठी सुध्दा घाई करीत आहेत. त्यामुळे लस घेणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली.१ मे पूर्वी लस घेण्याची घाई येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा शासनाने केली आहे. लसीकरणाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या जास्त होणार असून नंतर आपल्याला लस मिळेल की नाही याची नागरिकांना भीती आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. तीन दिवसांपासून लस नसल्याने लोक संतप्त लस उपलब्ध नसल्याने गुरुवारपासून कावराबांध येथे लसीकरण कार्यक्रम बंद आहे. लोकांना आपला जीव वाचविण्यासाठी लस लावून घेणे सर्वात प्रभावी उपाय वाटत आहे. परंतु लस मिळत नसल्याने लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्वरित लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.