गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून ब्रेक द चेनअंतर्गत नवीन निर्बंध लागू केले. मात्र, यानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसून नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची मंगळवारपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, दूध डेअरी, डेली निड्स, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ, मांस विक्री आणि कृषी विषयक साहित्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाने काढले होते. मात्र, यानंतरही रस्त्यांवरील गर्दी कमी झालेली नाही. नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावावर घराबाहेर पडत आहेत. परिणामी कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कठोर उपाययोजना केल्यानंतरही नागरिक त्याला जुमानत नसल्याने आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानेसुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची मंगळवारपासूनच अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. हे नवीन आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत, तर घरपोच सेवा देणाऱ्या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना किराणा व डेली निड्सच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी ११ वाजतापर्यंतच जाता येणार आहे.