गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी २९ सप्टेंबर रोजी तसे आदेश काढले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे व आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण प्रकरणामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगितले जाते. शर्मा यांनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी मोरे यांच्यावर कामांना घेऊन दबाव टाकून त्रास दिल्याचा आरोप मोरे यांनी ठेवला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत शिरून त्यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण केल्याचे प्रकरण रामनगर पोलिसांत नोंद आहे. या प्रकरणांना घेऊन नगरसेवक राकेश ठाकूर यांनी २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी २९ सप्टेंबर रोजी स्वीकृत नगरसेवक शर्मा यांचे सदस्यत्व रद्द करीत असल्याचे आदेश काढले. आदेशाची प्रत मुख्याधिकारी चंदन पाटील यांना शनिवारी (दि.१) प्राप्त झाल्यानंतर सोमवारी (दि.३) ती प्रत शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आली. (शहर प्रतिनिधी) उच्च न्यायालयात याचिका दाखल ४याप्रकरणी शर्मा यांनी, जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी कलम ४४ (१) (अ) अंतर्गत केलेली कारवाई पूर्णपणे अयोग्य असल्याचे सांगितले. शिवाय २९ सप्टेंबर रोजी प्रकरणाची तारीख नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यमुक्त झाले. त्यामुळे त्यांनी कुणाच्या तरी दबावात येऊन हे आदेश काढल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. हे आदेश व तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर येत्या १३ तारखेला सुनावणी असल्याचे शर्मा यांनी सांगितले. नगर परिषद अध्यक्षपदाची सोडत उद्या ४सर्वांच्या नजरा लागून असलेली नगर परिषद अध्यक्षपदाची सोडत अखेर येत्या बुधवारी (दि.५) काढली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने रविवारी (दि.२) परिपत्रक काढले. ४नगर परिषद प्रभागांच्या आरक्षणाची सोडत आटोपून बराच वेळ निघून गेला आहे. त्यामुळे प्रभागाच्या आरक्षणाची उत्सूकता शमली असून सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाकडे लागले होते. आरक्षण कळल्यानंतरच इच्छूकांना तयारीला लागता येणार असल्याने कधी आरक्षण सोडत होते याची उत्सुकता इच्छूकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांना होती. बुधवारी (दि.५) नगर परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला. ४नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.५) मुंबईत मंत्रालयाच्या परिषद सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी सहायक संचालक, संबंधीत जिल्हा प्रशासन अधिकारी, संबंधीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक आदिंना सूचित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातील १० लोकप्रतिनीधींना सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आदेशात नमूद आहे.
शिव शर्मा यांचे न.प.सदस्यत्व रद्द
By admin | Updated: October 4, 2016 01:05 IST