करवसुली अभियान : थकबाकीदार धास्तावले तिरोडा : कार्यालय नगर परिषद तिरोडाच्या वतीने शासकीय आदेशानुसार १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याकरीता ठोस पावले उचलली जात आहेत. थकबाकीदारांना वारंवार सूचना देवूनही न ऐकल्याने त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. ज्यांचेकडे कर थकबाकी आहे त्यांनी २५ मार्चपर्यंत कराचा भरणा करावा, याबाबत शहरात मुनादी दिली आहे. शहीद मिश्रा विद्यालयासमोरील गजेंद्र बाळकृष्ण नखाते यांच्या मालमत्तेला नगर परिषदेच्या वतीने सील करण्यात आले. करवसुली करण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या नेतृत्वात वसुली पथक तयार करण्यात आले. त्यात लेखाधिकारी झामसिंग चव्हाण, शाखा अभियंता सचिन मेश्राम, संदीप सूर्यवंशी, लोणारे, संजय परमार, दिगंबर लेंडे यांचा समावेश आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करवसुली १०० टक्के आवश्यक आहे. त्यापैकी ७५ टक्के वसुली झाली असून २५ टक्के वसुली बाकी आहे. २५ मार्चपर्यंत थकबाकीदारांनी कराचा भरणा न केल्यास थकीत मालमत्ता सील करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपले नगर परिषदेचे कर भरण्याची सुरुवात केली आहे. तर काहींनी याबाबतचा धसका घेतला असून ते धास्तावले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेने ७५ टक्के कर वसुली केली असून ३१ मार्चपर्यंत त्याचा आकडा निश्चितच वाढणार आहे. शहरातील आणखी काही मोठी मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ज्यांचेकडे किरायाने बँका, हॉटेल, मोठमोठी दुकाने आहेत त्यांची चौकशी करून कर वसुली करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) मोठ्या थकबाकीदारांचे लावणार होर्डिंग ज्यांच्याकडे कराची थकबाकी आहे, अशा मोठ-मोठ्या ५० व्यक्तीच्या नावांचे होर्डिंग लावण्याची कार्यवाही सुध्दा सुरू असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. नगर परिषदेने कर वसुलीसाठी उचललेले पाऊल चांगले असून या पैशातूनच नागरी सुविधा पूर्ण करण्यात येतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फायदा निश्चितच होणार आहे.
तिरोड्यातही मालमत्तेला सील करण्याचा सपाटा
By admin | Updated: March 23, 2017 00:58 IST