ओबीसींच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा : घाटनांद्र्याच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हे नोंदवा वर्धा :ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवत्तीचे १८०० कोटी रुपये शासनाने अद्याप दिले नाही. शिवाय शासनाचे निर्देश असताना शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क वसूल केले जात आहे. या प्रकाराविरूद्ध महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने बुधवारी शाळा, महाविद्यालय बंदचे आवाहन केले होते. यास जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून समुद्रपूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी एकेकाळी शासनाविरूद्ध लढा देणारे आता सत्तेत आहे; पण शिष्यवृत्तीचे १८०० कोटी रुपये अद्याप देण्यात आले नाहीत. परिणामी, ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिष्यवृत्तीस पात्र ओबीसी विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेऊ नये. शुल्क आकारल्यास शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हे नोंदविले जातील, असा आदेश २००४ मध्ये शासनाने काढला होता; पण या आदेशाला तिलांजली देत अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आकारले जात आहे. याविरूद्ध बुधवारी शाळा, महाविद्यालये बंदचे आवाहन केले होते. समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील लोक महाविद्यालय, न्यू आर्टस् कॉलेज, यशवंत महाविद्यालय, जे.बी. सायन्स कॉलेज, जी.एस. कॉमर्स कॉलेज व अग्निहोत्री महाविद्यालय परिसरातील शाळा बंद केल्या. विद्यार्थी तसेच शाळा, महा.च्या प्राचार्य, प्राध्यापकांनीही सहकार्य केले. यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, सुधीर पांगुळ, विजय मुळे, निळकंठ राऊत, भरत चौधरी, अभय पुसदकर, संजय म्हस्के, संजय भगत, किशोर तितरे, कविता मुंगले, सुनील दुबे, राजू नांदुरकर, रेखा पिसे, नंदिनी राऊत, रोहिणी पाटील, रेखा किटे, सातोकर व कार्यकर्ते सहभागी झाले. समुद्रपूर येथे ओबीसी विद्यार्थी संघटना व म. फुले समता परिषदेद्वारे शाळा, महाविद्यालये बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. एकमेव संस्कार ज्ञानपीठ ही शाळा बुधवारी सुरू होती. त्यांना विनंती करूनही ते बंद करण्यास तयार नव्हते. इतर सर्व शाळा, महाविद्यालये बंद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात प्रदीप डगवार, आशिष अंड्रस्कर, मनीष गांधी, सौरभ साळवे, हर्षल उमरे, सारंग घुमडे, रंजन साळवे, वैभव साळवे, विवेक घुमडे, सोहेल तूरक, संदीप घरडे, आशिष चव्हाण, चंद्रशेखर ताजने, रीता डांगरी, मीनाक्षी चिताडे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हिंगणघाट येथेही समता परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली. आंदोलनामध्ये सौरभ तिमांडे, अशोक रामटेके, अविनाश गमे, केशव तितरे, जयंत मानकर, गौरव तिमांडे, गौरव घोडे, प्रशांत लोणकर, सुनील ठाकरे, अमित कोपरकर, वैभव चांभारे, प्रवीण जनबंधू, निखील काळे, राकेश नागमोते, मोसीम अली, शेख अजर, अक्षय मुनोत, गौरव थोरात, चेतन भालेराव आदी उपस्थित होते.(लोकमत न्यूज नेटवर्क) महात्मा फुले समता परिषद व ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या मागण्या ओबीसींची जातिनिहाय जनगणना जाहीर करावी, ओबीसी शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये करावी, ओबीसींना सर्व अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती व शुल्क परतावा देण्यात यावा, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची इबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये करावी आदी मागण्यांसह विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ बुधवारी शाळा, महाविद्यालये बंदचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचा निषेध घाटनांद्रा येथील जया राठोड या विद्यार्थिनीने अकरावीचे प्रवेश शुल्क भरता न आल्याने आत्महत्या केली. या प्रकारास शिक्षण व सामाजिक न्याय विभाग जबाबदार असल्याने संबंधित महा.च्या प्राचार्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी म.फुले समता परिषदेने केली. चंद्रपूर येथील लोमेश येरणे या विद्यार्थ्यानेही यासाठीच आत्महत्या केली. चार तालुक्यांत मागमूसच नाही जिल्ह्यातील सेलू, आर्वी, कारंजा (घा.) आणि देवळी या तालुक्यांत समता परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. चारही तालुक्यांतील तसेच शहरांतील शाळा, महाविद्यालये सुरळीत सुरू होती.
शाळा, महाविद्यालये बंद
By admin | Updated: July 28, 2016 00:24 IST