चौकशीची मागणी : सरपंच, ग्रामसेवक व शाखा अभियंत्याचे साटेलोटेपरसवाडा : दवनीवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोली दुरूस्तीचे कम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळेच वादळीवाऱ्यात खोल्यांचे टिनशेड पडले. इ-टेंडर न करताच कामाला सुरूवात झाली असून यात सरपंच, ग्रामसेव व अभियंत्याचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत मंजूर या कामात सात लाखांच्या निधीतून दोन वर्गाचे बांधकाम करावयाचे आहे. शंभर वर्षे जुनी इमारत असून त्याच इमारतीला डागडुजी करण्यात येत आहे. सात लाखांत दोन नवीन वर्गखोल्यांची इमारत तयार झाली असती. पण अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जीर्ण इमारतीला डागडुजी करुन लाखो रुपये डकारण्याचा सपाटा सुरू आहे. सदर काम ग्रामपंचायतचे असून तत्कालीन ग्रामसेवक लिल्हारे यांनी हिटलरपणा करुन शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीने सरपंच कुटुंबातीलच आपल्या घरातील माणसाला काम दिले. ई-टेंडर न करता कामाला सुरुवात केली. एक लाख रूपयांच्यावर किमतीचे साहित्य खरेदी केल्यास ई-निविदा जाहिरात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. पण सरपंच, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता यांनी सर्व नियमांची पायमल्ली केली आहे. यामुळेच शनिवारी रात्री आलेल्या वादळीवाऱ्याने वर्गखोल्यांचे टिनाचे शेड उखडून पडले. हे शेड लवण्याकरित जुन्या लाकडांचा वापर करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. याबाबत शाखा अभियंता शुक्ला यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. ग्रामसेवक बिसेन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, आताच चार्ज घेतला असून याची जाणीव पूर्ण नाही. कामाची संपूर्ण चौकशी करून व रितसर नसेल तर देयक काढण्यात येणार नाही असे सांगीतले. तसेच तत्कालीन ग्रामसेवक लिल्हारे यांनी काम केले याची जाणीव नसल्याचेही सांगितले. सदर काम बंद करुन चौकशी करण्याची मागणी गावकरी नागरिक व शाळा समिती अध्यक्षांनी केली आहे. (वार्ताहर)
शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By admin | Updated: May 2, 2017 00:31 IST