नागरिकांत रोष : सिव्हील लाईन्सवासीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनगोंदिया : शहराच्या सिव्हील लाईन्स परिसरात नझूलशिट ८ व ९ जवळ जवळपास ७०-८० वर्षे जुने हनुमान मंदिर आहे. या मंदिर परिसरात दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यात जवळपास २० ते २५ हजार भाविकांचा सहभाग असतो. याशिवाय मंदिराच्या बाजूला असलेल्या प्रांगणात वर्षभर धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु सदर परिसरात मुख्यमंत्रीद्वारे नगर परिषद गोंदियासाठी समाजभवन बनविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. असे झाले तर परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. या प्रकारामुळे सदर हनुमान मंदिराजवळील परिसरात समाज भवनाच्या बांधकामास स्वीकृती देण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन सिव्हील लाईन्स परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनानुसार, सिव्हील लाईन्स मार्गावर दिवसभर रहदारी असते व रस्त्याची रूंदी केवळ २५ फूट आहे. दुसरा मार्ग बीजीडब्ल्यू रूग्णालयाकडे जातो. जर येथे समाजभवन तयार करण्यात आला तर रूग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. परिसरात वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे आतासुद्धा मंदिरात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय परिसरात दुसरा खाली मैदानही उपलब्ध नाही. जर या खाली मैदानावर समाज भवनाचे बांधकाम केले गेले तर बालकांना खेळण्यासाठी जागा राहणार नाही. ज्या जागेवर समाज भवनाचे बांधकाम प्रस्तावित आहे, तिथपासून वाघ इटियाडोह सिंचन विभागाचे कार्यालय, दक्षिणेला वन अधिकाऱ्यांचे निवास, पूर्वेकडे सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहेत. समाजभवन बनल्यानंतर येथे होणाऱ्या कार्यक्रमामुळे ध्वनी प्रदूषणही होईल. याचा त्रास विद्यार्थ्यांसह येथील रहिवाशांना होईल. या सर्व समस्यांमुळे समाज भवनासाठी गोंदियाच्या नजूलशीट क्रमांक ८ व ९ ऐवजी इतर ठिकाणी अनुमती देण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी प्रतिनिधी मंडळात अशोक यादव, रामदेव मिश्रा, तुळशीदास परमार, विशाल मोदी, राजकुमार पटले, नंदकिशोर अग्रवाल, राकेश बंसल, पुरूषोत्तम पुरोहित, बाबुलाल सोनी, पं. सुरेंद्र शर्मा, संजय वस्तानी, ईश्वर नेचवानी व इतर नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समाजभवनाच्या बांधकामाला मंजुरी देऊ नये
By admin | Updated: September 7, 2015 01:49 IST