सडक-अर्जुनी : अवघ्या दोन किलोमीटरवरील चूलबंद नदीच्या काठावर असलेल्या मानिनघाट तीर्थक्षेत्र येथील नदीच्या पात्रात वाळूमाफियांनी भरदिवसा वाळूवर डल्ला मारणे सुरू केले आहे. दररोज १० ट्रॉली अवैध वाळूचा उपसा होत आहे. याकडे मात्र संबंधित विभाग मुद्दामहून कानाडोळा करीत आहे की काय? हा प्रश्न पडला आहे. वाळू उपसा करून बेछूटपणे वाहतूक होत असल्यामुळे येथील मुख्य मार्गापासून बौद्ध कुटीपर्यंतच्या रस्त्याची वाट लागलेली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मानिनघाट तीर्थक्षेत्राला लागून असलेल्या चूलबंद नदीला सुरक्षा भिंतीचे काम कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्यात आले. कंत्राटदाराने वाजवीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून इतर साइटवर हलविली. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. कंत्राटदाराला सुरक्षाभिंतीचे काम पूर्ण करायला? दिले होते की वाळू उपसा करायला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा भिंतीच्या कामामुळे परिसरात साफसफाई झाल्यामुळे इतरही वाळूमाफियांनी या क्षेत्रात वाळू तस्करीसाठी मोर्चा वळविला आहे. सद्य:स्थितीत रोजच पाच ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉली वाळू उपसा होत आहे. चूलबंद नदीत पुरामुळे उच्चप्रतीची वाळू वाहून येत असल्यामुळे या वाळूला बांधकाम करणाऱ्यांकडून मागणी होत आहे. परिणामी चढ्या दराने विक्री केली जात आहे. बेफाम वाळू उपसा करून वाळूमाफियांनी अर्ध्या किलोमीटरपर्यंतचे नदीचे पात्र पोखरले आहे. मात्र, अजूनही वाळूमाफियांवर कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे संबंधित विभागाचे कर्मचारीच साथ तर देत नाही ना? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
बॉक्स
वाळू वाहतुकीसाठी जंगलातून रस्ता
सध्या कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागातही झाल्यामुळे विशेषत: नागरिक फिरकत नाही. याचाच फायदा घेत वाळूमाफिया भरदिवसा वाळूचा अवैध उपसा करून जंगलमार्गे वाहतूक करीत आहेत. जंगलातील झाडे कापून मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे.