भंडारा : शेतकरी ते ग्राहक मालाची थेट विक्री या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५१ लाख रुपयांच्या तांदळाची विक्री झाली आहे. यामुळे दलालांची मध्यस्थी संपून शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होण्याबरोबरच ग्राहकांनाही वाजवी दरात चांगल्या दजार्चा तांदूळ उपलब्ध झाला आहे. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात एकूण १ लक्ष ९६ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी १ लक्ष ९० हजार क्षेत्रामध्ये धानाचे पीक घेण्यात येते. जिल्ह्यातील शेतकरी तांदूळ न विकता धानाची विक्री करतात. त्यामुळे नफ्याची टक्केवारी कमी असते. योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी निराश होतो. यावर उपाय म्हणून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा(आत्मा) यांच्यावतीने नागपूर येथे तांदूळ महोत्सवाचे आयोजन मागील वषार्पासून सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी धान विकता त्याची भरडाई करून तयार झालेला तांदूळ विकावा, यासाठी आत्माने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या वर्षी हा महोत्सव नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात जिल्ह्यातील ३० शेतकरी गटांनी सहभाग घेतला.
शेतकऱ्यांच्या ५१ लाख रुपयांच्या तांदळाची विक्री
By admin | Updated: February 25, 2015 00:19 IST