गोंदिया : मुळातच मनाने कणखर असलेल्या महिलांना वर्तमानात एकाच वेळी दोन फळीवर स्वत:ला सिद्ध करावे लागत आहे. कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्यात उपजतच आहे. २१व्या शतकात स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना मिळालेले भरारीचे पंख विस्तारण्याच्या भावही त्यांच्यात आहेत. अशा दुहेरी जबाबदारीतही स्वत:ला सिद्ध करण्याची किमया महिला साधते आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून पुढे चालण्याचा काळ आता जुना झाला. महिला आता एकहाती नेतृत्व स्वीकारत आहेत. विविध क्षेत्रांत त्यांचे स्वत:चे अस्तित्व निर्माण झाले आहे. या सर्व यशस्वी महिला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मंगळवारी एकत्र आल्या होत्या.
आम्ही घडलो आणि आता आमच्यासारख्याच दुसऱ्या महिलांना घडविण्यासाठी त्यांची ‘सखी’ होण्याचा गजर त्यांनी यावेळी केला. एकमेकांना साहाय्य करत, एकमेकांच्या मैत्रिणी होत गरूडझेप घेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.
विविध क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा जीवनपट मांडलेल्या ‘लोकमत’ वुमेन ॲचिव्हर्स कॉफी टेबल बुक व प्रकाशन सोहळा मंगळवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पाइंटमध्ये पार पडला. रोकडे ज्वेलर्स, वाघमारे मसाले, ऑलिव्ह रिसॉर्ट आणि विदर्भ मीडियाच्या सहयोगाने हा सोहळा पार पडला.
यावेळी विशेष पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून रोकडे ज्वलेर्सचे संचालक राजेश रोकडे, वाघमारे फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक प्रकाश वाघमारे, ऑलिव्ह रिसॉर्ट ॲण्ड विलाच्या संचालिका संध्या चौकसे आणि विदर्भ मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश रंगारी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबलचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापिका स्व.ज्योत्स्ना विजय दर्डा यांचे स्मरण करण्यात आले. कॉफी टेबल बुकचे लेखन आणि संपादन वर्षा बासू यांचे आहे, तर छायाचित्रे महेश टिकले यांची आहेत. यावेळी अनामिका रोकडे व संध्या चौकसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. संचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता शेलगावकर यांनी केले, तर आभार पूनम तिवारी-महात्मे यांनी मानले.
बॉक्स
सखींनो, अंतर्मनाने तरुण व्हा: किशोरी शहाणे
मी तरुण म्हणजे काय, तर माझे अंतर्मन तरुण असणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:विषयीच्या जबाबदारीकडेही लक्ष देणेे गरजेचे आहे. आपण स्वत: अंतर्मनाने तरुण असू, तर आपल्यावाटे कुटुंबही सतत प्रेरित होईल आणि स्वत:च्या कर्तृत्वालाही योग्य तऱ्हेने चालना देता येईल, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहारे यांनी यावेळी उपस्थित सखींना केले.
दी नाइड थिंकर्सचे सादरीकरण
यावेळी महिलांच्या मनोजनाकरिता दी नाइड थिंकर्सच्या वतीने संगीतमय कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. यात गिटार वादन व गायन साहिल गजभिये, कीबोर्डवर ऋषभ ढोमणे, ड्रमवर जैनम शहा यांचा समावेश होता.
कर्तृत्वान महिलांचा सत्कार
कर्तृत्वान महिलांचा सत्कार
कॉफी टेबल बुकमध्ये जीवनपट मांडलेल्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी किशोरी शहाणे व प्रयोजकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात डॉ.इंदिरा सपाटे, प्रा.डॉ.माधुरी नासरे, भारती तिडके, सोनाली देशपांडे यांचा समावेश होता.