बोंडगावदेवी : येथून जवळपास असलेल्या सरांडी (रिठी) शिवारात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असल्याने धान पिकाचे नुकसान होत आहे. वनविभागाने जनावरांचा उपद्रव थांबविण्याची मागणी येथील कास्तकारांनी केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदराव पाऊलझगडे यांची गावाजवळच्या सरांडी (रिठी) शेतीशिवारात तीन एकर शेती आहे. सदर शेतामध्ये हलक्या प्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. धान तोंडणीला आला असता जंगल व्याप्त परिसर लागून असल्याने जंगली जनावरांचा नेहमीच उपद्रव सुरू असतो. परिसरातील दोन-तीन एकरातील धानाचे पीक पूर्णत: जनावरांच्या उपद्रवाने नेस्तनाबूत झाले आहे. शेतामधील हाती येणारे पीक जंगली जनावरांनी फस्त केल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून शेतामध्ये धानाचे पीक उभे करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जंगली जनावरांनी नित्यनेम धुमाकूळ घातल्याने घरी येणाऱ्या पिकापासून त्या शेतकऱ्याला वंचित राहण्याची पाळी आली आहे. जनावरांच्या उपद्रवाने ५० हजार रुपयांचा धान वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तक्रार सदर वनविभाग नवेगावबांधकडे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
श्वापदांच्या उपद्रवाने धानपिकाची नासाडी
By admin | Updated: September 27, 2015 01:15 IST